पोलिसांकडून कारणांचा शोध: रावेरातील पसार क्लीनरचा शोध सुरू
भुसावळ: रावेर शहरात सिमेंटचा ट्रक खाली करण्यासाठी आलेल्या ट्रक चालकाचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली तर भुसावळात नाहाटा महाविद्यालयाच्या पश्चिम भिंतीलगत मजुराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडल्याने पोलिसांनी धाव घेत कारणांचा शोध सुरू केला आहे.
रावेरात ट्रक चालकाचा खून
चंद्रपूर येथून सिमेंट खाली करण्यासाठी एक रावेर शहरात रविवारी दाखल झाला होता. सावदा रोडलगतच्या पटेल एजन्सीच्या आवारात हा ट्रक उभा असताना रविवारी मध्यरात्री ट्रक चालक राजूभाई सुमनभाई गावीत (26, सोनगढ, वापी) याचा ट्रकमधील क्लीनर (नाव, गाव माहित नाही) याने दगडाने ठेचून खून केल्याची सोमवारी पहाटे उघडकीस आली. खुनानंतर क्लीनर ट्रकसह पसार झाला असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी धाव घेत तपासाच्या सूचना दिल्या.
भुसावळात मजुराचा संशयास्पद मृत्यू
भुसावळ शहरातील नाहाटा चौफुलीजवळ एका अपार्टमेंटमध्ये वॉचमनसोबत रहावयास आलेल्या मजुराचा रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. गेंद्या संतोष भिलाला (30, सोळंकी) असे मयताचे नाव आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे व उपनिरीक्षक मनोज ठाकरे आदींनी भेट देत माहिती जाणून घेतली. मजुराच्या अंगावर मारहाणीच्या खुना नसल्याने हा खून नसल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितले. मद्य सेवनामुळे भिलाला यांना चक्कर येऊन पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.