रावेरला राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन

0

तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ; शासनाच्या कारभाराविरुद्ध जोरदार धोषणाबाजी

रावेर- घटलेले पर्जन्यमान व त्यामुळे विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी खालावल्याने रावेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, बेसुमार वाढणार्‍या रासायनिक खतांचे भाव कमी करून शेतकर्‍यांना त्यावर 250 रुपयांनी सबसिडी वाढवून मिळावी, बेहिशेबी वीज बिल कमी करावे या मागण्यांसाठी राष्ट्रवादी ओबीसी सेलने बुधवारी रावेरात धरणे आंदोलन केले. तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. या धरणे आंदोलनाला ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, उपाध्यक्ष अ‍ॅड.सचिन आवटे, राज्य समन्वयक राज राजापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भविष्यात या आंदोलनाची व्याप्ती वाढवून जिल्हास्तरीय मोर्चा काढू, असे ते म्हणाले. केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. गोपाळ बर्‍हाटे, गिरधर भंगाळे, विष्णू भिरुड, गोपाळ भिरुड, गिरीश नेहेते, गिरीश भंगाळे उपस्थित होते.