रावेर : रावेर पंचायत समितीच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचाराच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिस प्रशासनाचे तपासाचे चक्र मुख्य सूत्रधार समाधान निंभोरेकडे वळवले आहे. आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात इतर कोण जबाबदार आहे? हे शोधण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणी आठ आरोपी अटकेत असुन सर्वांना मंगळवार, 12 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेली स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक शौचालय योजनेध्ये भ्रष्ट्राचार झाल्याचे उघड झाल्यानंतर आता रावेर तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी व माजी पंचायत समिती सदस्यांच्या नजरा पोलिसांच्या तपासाकडे लागलया आहेत.
तपासाधिकारी आले पुन्हा चर्चेत
रावेर शहरातील दंगल शांत करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक वैयक्तीक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचाराच्या गुन्ह्याचे तपास अधिकारी आहेत. अतिशय गुंतागुंतीच्या या गुन्ह्यात पोलिस प्रशासनाकडून प्रत्येक कागदाची बारकाईने तपासणी करून आरोपींचे अटकसत्र अवलंबले जात आहे. नाईक यांनी नाशिकमध्ये गाजलेल्या रेशन घोटाळ्याच्या तपासातदेखील महत्वाची भूमिका बजावली होती आणि आता शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचाराच्या तपासमुळे नाईक पुन्हा चर्चेत आहेत.
या प्रश्नाची उत्तरे जनतेला अपेक्षित
बेसलाईनची यादी टाळून मनमानी पध्दतीने अनुदान कोणाच्या आशीर्वादने दिले गेले? शौचालय अनुदानाचा प्रस्ताव नसतांना लाभार्थीना अनुदान टाकलेच कसे.? दोन कंत्राटी कर्मचारी करोडोचे अनुदान वारेमाप पध्दतीने खर्च करत असतांना जबाबदार अधिकारी काय पाहत होते? लेखाधिकार्यांनी स्वत:च्या कुटुंबाच्या खात्यावर अनुदान कोणाच्या आशीर्वादाने वर्ग केले.? शासनाच्या करोडो रुपयांचे भ्रष्ट्राचाराची जबाबदारी दोन कंत्राटी कर्मचार्यांवर निश्चित केली जाईल की यात अजुन मोठ्या शासकीय व्यक्तीची एंट्री होईल.? या संपूर्ण वैयक्तीक शौचालय योजनेच्या प्रकरणात कोणाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे ? तालुक्यातील ती 126 संशयित बँक खाती कोणाची ? भ्रष्ट्राचार योजना सुरळीत चालवण्यासाठी इतके वर्ष निंभोरेंना कोणाचे पाठबळ होत ? भ्रष्ट्राचाराचे पैसे निंभोरे यांनी कोण-कोणाला दिले.? या सर्व प्रश्नाची उत्तरे जनतेला अपेक्षित आहे.