‘जनशक्ती’च्या वृत्ताचे शेतकर्यांमधून स्वागत ; अरेरावी पडली महागात
रावेर- रावेर तालुका कृषी अधिकार्यांनी शेतकर्यांना केलेली अरेरावी त्यांच्या अंगलट आली असून राज्याच्या कृषी मंत्रालयाने कार्यवाहीचा आदेश काढल्याने कृषी विभागात खळबळ उडाली असताना प्रत्यक्षात आता काय कार्यवाही होते याकडे रावेर तालुक्यातील शेतकर्यांचे लक्ष लागले आहे तर ‘दैनिक जनशक्ती’च्या वृत्ताचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.
शेतकर्यांना केलेली अर्वाच्च शब्दात अरेरावी
तालुक्यात दुष्काळी परीस्थिती असताना शेतकरी खरीप हंगामात पावसाअभावी अल्प उत्पन्नाअभावी चिंताग्रस्त झाले असताना थंडीची चाहुल लागल्याने शेतकरी पुन्हा रब्बीच्या पेरणीसाठी सज्ज झाला असताना शेतकर्यांनी बियाण्यांसाठी कृषी कार्यालय गाठले होते. कृषी विभागाकडून शेतकर्यांना 7/12 उतार्यावर अनुदान तत्वावर हरभरा, गव्हाच्या बियाण्यांची परमीटे कृषी कार्यालयामार्फत दिली जात होती. शेतकर्यांनी याची माहिती तालुका कृषी अधिकारी यांना विचारण्यासाठी गेले असता एस.एस.पवार यांनी अर्वाच्च भाषेत ‘मी तुमचा नोकर नाही, येथून चालते व्हा’ असे शेतकर्यांना सुनावले होते. या संदर्भात ‘दैनिक जनशक्ती’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्याची कृषी मंत्रालयाकडून दखल घेण्यात आली होती.
आता कृषी अधिकार्यांवरील कारवाईकडे लागले लक्ष
मंत्रालयातील कार्यासन अधिकारी अ.ज्ञा.लांडगे यांनी पुणे येथील आयुक्त(कृषी), कृषी आयुक्तालय तर नाशिक येथील विभागीय कृषी सह संचालक यांना आदेश देऊन रावेर तालुका कृषी अधिकारी यांच्यावर तत्काळ 21 दिवसांच्या आत कार्यवाही करून तसा अहवाल कृषी मंत्रालयास कळवण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाच्या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी एस.एस.पवार यांच्यावर नेमकी काय कार्यवाही होते? याकडे रावेर तालुक्यातील शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.