रावेर तालुक्यातील ‘जलयुक्त’च्या निकृष्ट कामांची परळी पॅटर्नप्रमाणे चौकशीची मागणी

रावेर : रावेर तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेची कामे निकृष्ट झाल्याची ओरड असून आमदार शिरीष चौधरी यांनी विधानसभेत एलएक्यूदेखील मांडला आहे. रावेर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची चौकशी होणार असून ही चौकशी बीड जिल्ह्यातील परळी व अंबाजोगाई तालुक्याप्रमाणे करण्याची मागणी सुज्ञ जनतेतून होत आहे.

कोट्यवधी खर्चूनही जलपातळी वाढलीच नाही
रावेर तालुक्यातील 19 गावांमध्ये 2015 ते 2018 या कालावधीत एकूण 417 कामे करण्यात आली. या कामांवर 13 कोटी 44 लाख 25 हजार 77 रुपये खर्च झाले आहेत. याच काळात 2015-16 मध्ये 104 टक्के, 2016-17 मध्ये 105 टक्के, 2017-18 मध्ये 97 टक्के, तर 2018-19 मध्ये 71 टक्के पाऊस झालेला आहे. 2018-19 वर्ष वगळता तालुक्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. असे असतानाही कामे झालेल्या गावांच्या भूगर्भातील पाणी पातळीत मात्र वाढ झालेली नसल्याचे स्थानिक नागरीक सांगतात.

कामांची परळी पॅटर्नप्रमाणे चौकशी करा
रावेर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेची कामे चौकशीच्या फेर्‍यात आहे.जलयुक्त शिवार कामांचा घोळ यापूर्वी परळी व अंबाजोगाई तालुक्यातील घडला होता. येथे जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात कामे निकृष्ट झाल्याचे तपासात समोर आले होते. या प्रकरणी विविध 33 अधिकारी, कर्मचारी व 167 गुत्तेदार संस्था यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या तालुक्यांमध्ये जलयुक्त शिवार योजनेत आठ कोटी 28 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला. या प्रकरणातील अधिकार्‍यांकडून 50 टक्के व गुत्तेदारांकडून 50 टक्के रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते.जलयुक्त शिवार योजने निकृष्ट कामांप्रकरणी बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे.