रावेर तालुक्यात गोठा योजनेतही मोठा भ्रष्टाचार
रावेरात पेटले राजकारण : महाविकास आघाडीने केली सखोल चौकशीची मागणी
रावेर : रावेर पंचायत समितीत तब्बल दिड कोटी रुपयांचा वैयक्तिक शौचालय योजनेत भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर तालुक्यात राजकीय आखाडा पेटला असतानाच गुरुवारी भाजपा पदाधिकार्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करीत झारीतील शुक्राचार्य समोर आणण्याची अपेक्षा पत्रकार परीषदेतून व्यक्त केली होती. यानंतर शुक्रवारी महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी तब्बल 10 वर्षांपासून पंचायत समितीवर भाजपाची सत्ता असल्याने याच काळात सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याने योजनांची सखोल चौकशीची मागणी केली आहे. दोषी असलेल्या अधिकार्यांसह पदाधिकार्यांवर निपक्षपणे कारवाई करण्यात यावी, असे पदाधिकारी म्हणाले. दरम्यान, भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर रावेर राजकीय पक्षांमध्येही आखाडा पेटल्याचे दिसून येत असून या प्रकारातील दोषी जनतेसमोर आणण्याची गरज असल्याचे मत नागरीकांमधून व्यक्त होत आहे.
रावेरात पेटला राजकीय आखाडा
शुक्रवारी महाविकास आघाडीच्या तालुकाध्यक्षांनी पत्रकार परीषदेचे आयोजन केले आहे. रावेर पंचायत समितीतील वैयक्तीक शौचालय योजनेच्या भ्रष्ट्राचाराचा तपास ‘आयपीएस’ दर्जाच्या अधिकार्यांकडून करण्यात यावा तसेच पंचायत समितीत गेल्या 10 वर्षांपासून भाजपाची सत्ता असून त्यांच्याच कार्यकाळात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावाही करण्यात आला. भ्रष्टाचार प्रकरणात दोषी जो कुणी असेल त्यांच्यावर प्रामाणिकपणे कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली शिवाय पंचायत समितीतील गोठा योजना व सार्वजनिक शौचालयांची गेल्या दहा वर्षांपासून चौकशी करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या तालुकाध्यक्षांनी पत्रकार परिषद मध्ये केली.
संपूर्ण सिस्टीमवर ठेवले पदाधिकार्यांनी बोट
भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर व नंदकिशोर महाजन यांनी गुरुवारी पत्रकार परीषद घेतल्यानंतर शुक्रवारी महाविकास आघाडीच्या तालुकाध्यक्षांनी तडकाफडकी संयुक्त पत्रकार परीरषद घेतली. यावेळी भाजपा व शौचालय योजनेत येणार्या संपूर्ण सिस्टीमबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या भ्रष्टाचाराला अधिकारी जबाबदार असो की पदाधिकारी कुणाला सोडण्यात येवू नये तसेच आमचे सदस्य दोषी आढळल्यास त्यांची आम्ही हकालपट्टी करू, असा निर्धार तिघा तालुकाध्यक्षांनी माध्यमांपुढे बोलताना व्यक्त केला.
पत्रकार परीषदेला यांची होती उपस्थिती
काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, शिवसेना तालुकाप्रमुख योगीराज पाटील, राष्ट्रवादी ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, शहराध्यक्ष महेमूद शेख, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, पंकज वाघ, अटवाडे सरपंच गणेश महाजन आदी उपस्थित होते.