रावेर : तालुक्यातील थेरोळा परीसरात बिबट्याचा धुमाकुळ कायम असून शनिवारी रात्री एका गायीची शिकार केल्याची घटना घडल्याने पशूपालकांमध्ये भीती पसरली आहे. धुमाकूळ घालणार्या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतुन होत आहे. थेरोळा येथील युवराज भावळु पाटील यांच्या शेतात बांधलेली पाळीव गाय बिबट्याने फस्त केल्याने पशूपालक धास्तावले आहेत. घटनास्थळी वनपाल अतुल तायडे यांनी धाव घेत पाहणी केल्यानंतर गायीची शिकार करणारा प्राणी बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले. या भागात गत वर्षापासून बिबट्याचा वावर असून त्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. याबाबत वनक्षेत्रपाल मुकेश महाजन यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होवू शकला नाही.