दहा केंद्रावरील ईव्हीएम नादुरुस्त झाल्याने तातडीने बदलले ; चौका-चौकात आता विजयाचे आडाखे
रावेर- रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत रावेर मतदार संघातील 319 मतदान केंद्रावर सायंकाळी पाच वाजेपर्यंत 62 टक्के मतदान झाले होते तर सायंकाळी सहा वाजेनंतर हा आकडा सुमारे 66 टक्क्यांपर्यंत पोहोचला. ईव्हीएममधील किरकोळ तांत्रिक दोष वगळता सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. रावेर लोकसभा मतदार संघातील रावेर विधानसभा मतदार क्षेत्रात सकाळी नऊ वाजेपूर्वी 28 हजार 869 मतदारांनी हक्क बजावला तर 9.72 टक्के मतदान झाले. सकाळी 11 वाजता 70 हजार 882 मतदारांनी मतदान केल्याने 23.65 इतके मतदान झाले तर दुपारी एक वाजेपर्यंत एक लाख 14 हजार 349 मतदारांनी आपला हक्क बजावल्याने 38.48 टक्के मतदान झाले. निवडणूक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक लाख 84 हजार 282 मतदारांनी हक्क बजावल्याने तब्बल 62 टक्के इतके विक्रमी मतदान झाले.
दहा ठिकाणी ईव्हीएम बदलले
रावेर विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी विवरे बुद्रुक, पातोंडी, निंभोरा बु.॥, डोंगरकठोरा, गारखेडा, भालशीव, फैझपूर व यावल येथील प्रत्येकी मतदान केंद्रावर तर आमोदा येथील दोन मतदान केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने सहा.निवडणूक अधिकारी अजित थोरबोले यांनी तत्काळ दुसर्या ईव्हीएम मशीनची व्यवस्था केल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनीदेखील निवडणुकीचा आढावा घेत कर्मचार्यांना सूचना केल्या.
खासदारांच्या निवडीविषयी लाखांच्या पैजा
रावेर लोकसभा मतदार संघात भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे व काँग्रेस-राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांच्यात सरळ लढत झाल्याने आता जिंकणार कोण? यावर ठिकठिकाणी पैजा लावल्या जता आहेत. काही पदाधिकार्यांनी तर थेट एक लाखांची पैज लावल्याचे सांगण्यात आले.
आरोग्य विषयक सुविधा सज्ज
रावेर लोकसभा मतदार संघातील रावेर विधानसभा मतदार संघातील मतदान प्रक्रियेदरम्यान निवडणूक कर्मचारी अथवा मतदार यांना आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्यास जागेवरच त्यांना औषधोपचार मिळावा म्हणून सहा.निवडणूक अधिकारी अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप चौधरी, रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला, मुख्य अधिपरीचारीका कल्पना नगरे यांनी सर्व मतदान केंद्रावर प्रथमोपचार औषधी किट उपलब्ध केले होते.
लोकप्रतिनिधींही बजावला हक्क
काँग्रेस उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांनी विवरा येथे मतदानाचा हक्क बजावला तर आमदार हरीभाऊ जावळे यांनी भालोद, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी खिरोदा, माजी आमदार अरुण पाटील यांनी धामोडीत, भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी रावेरच्या यशवंत हायस्कूलमध्ये पत्नी ललिता चौधरी, मुलगा धीरज, मुलगी नंदिनी सोबत मतदानाचा हक्क बजावला तसेच नगराध्यक्ष दारा मोहम्मद, डॉ.संदीप पाटील, ललित चौधरी यांनी रावेर येथे मतदानाचा हक्क बजावला.