रावेर : आठ दिवसांपूर्वी रावेरातील केळी पट्ट्यात वादळी वार्यामुळे केळी उत्पादकांचे 50 कोटींचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवार, 8 रोजी पुन्हा रावेर तालुक्यात वादळी वार्यामुळे केळीला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. तापी पट्यातील गावांना सर्वाधिक फटका बसला असून सुमारे पाचशे शेतकर्यांचे सातशे हेक्टरवरील 75 कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आठवडाभराच्या काळात दुसर्यांदा नैसर्गिक संकट कोसळल्याने केळी उत्पादक मोठ्या संकटात सापडले असल्याने शासनाने आता सरसकट भरपाई देण्याची मागणी आहे.
केळी उत्पादकांचे 75 कोटींचे नुकसान
रावेर तालुक्यात बुधवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास वादळी वाद्याला सुरूवात झाली तर काही भागात पाऊसही बरसला. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेक ठिकाणी महावितरणच्या तारांवर झाड पडल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. आलेल्या वादळाचा सर्वाधिक फटका केळी पिकांना बसला असून अनेक गावांतील घरांवरील पत्रेदेखील उडाल्याचे वृत्त आहे. अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी वर्ग कमालीचा हवालदील झाला आहे.
या गावांना बसला वादळाचा फटका
रावेर तालुक्यात बुधवारी दुपारी आलेल्या वादळामुळे सर्वाधिक फटका धामोडी व सिंगत या गावाला बसला आहे तर त्या खालोखाल सुलवाडी, कोळदा, वाघाडी, सुलवाडी, कांडवेल, शिंगाडी या तापी पट्याला लागून असलेल्या गावांना वादळाचा सर्वाधिक फटका बसला. .दरम्यान या बाबतची माहिती मिळताच भाजपाचे हरलाल कोळी नुकसानग्रस्त गावांना भेटी दिल्या.
अनेक गावांची वीज गुल
अचानक आलेल्या वादळामुळे विजांच्या तारांवर झाडे पडल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला तर अनेक शेतकर्यांच्या शेतामध्ये पाणी साचले. दरम्यान, आठवडाभरातच दुसर्यांदा केळी उत्पादकांवर संकट कोसळले असून शासनाने आता सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.