भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निकाल
रावेर : रावेर शहरात रामनवमीच्या दिवशी दंगल उसळून दोन समाजातील गटात हाणामारी झाल्याने एका समाजातील इसमाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दंगल व खून प्रकरणी 15 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होता. भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालल्यानंतर सबळ पुराव्याअभावी संशयीत आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
15 संशयीतांची निर्दोष मुक्तता
रावेर शहरात 13 एप्रिल 2008 रोजी रावेर शहरातून राम नवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. कोतवाल वाड्यातील प्रार्थनाजवळून मिरवणूक जात असताना दोन समाजातील गटात दंगल होवून युनूस खा इब्राहीम खा यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू ओढवला होता. या प्रकरणी रावेर पोलिसात दंगल व खून केल्याच्या आरोपाखाली 15 संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल 11 वर्ष या खटल्याचे कामकाज चालले. भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात या खटल्यात सर्व साक्षी-पुरावे तपासल्यानंतर मंगळवारी जिल्हा सत्र न्या.एस.पी.डोरले यांनी संशयीतांची ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयीतांमध्ये शंतनू डहाळे, अविनाश हरने, संतोष महाजन, मुक्तानंद दानी, दिनेश सोनवणे, किशोर मानकर, अतुल महाजन, प्रमोद महाजन, किशोर महाजन, चंद्रकांत माळी, रवींद्र महाजन, सुनील शिंदे, सुरेश शिंदे, योगेश परदेशी, विनोद तायडे यांचा समावेश होता. संशयीतांतर्फे अॅड.व्ही.आर.ढाके, अॅड.एल.के.शिंदे, अॅड.के.डी.ठाकुर, अॅड.तुषार माळी यांनी काम पाहिले. सरकारतर्फे अॅड.सोनवणे यांनी काम पाहिले.