रावेर दंगलीप्रकरणी 149 संशयित अटकेत; कामगिरीमुळे पोलीस कर्मचार्‍यांना रिवार्ड

0

जळगाव– रावेर शहरात 22 मार्च रोजी दोन गटात दंगल उसळली होती. या दंगलीत दगडफेक तसेच बेदम मारणीमुळे एकाचा मृत्यू झाल्याचेही समोर आले होते. विशेष पोलीस महानिरिक्षकांनी भेट देत आढावा घेतला होती. तसेच दोन्ही गटाच्या सर्व संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्यासह कर्मचार्‍यांनी दिवसरात्र एक करुन महिनाभरात दंगलप्रकरणीत 149 संशयितांना अटक केली आहे. आजवरच्या रावेरातील दंगली घटनांच्या इतिहासात गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर संशयितांना अटक करण्यात आली आहे. दिवसरात्र मेहनत घेत संशयिताच्या शोध घेण्यासह त्यांना अटक करण्यात महत्वाची भूमिका बजावणार्‍या सर्व कर्मचार्‍यांचा कामगिरीनुसार 2 हजार ते पाच हजार रुपयाच्या रकमेचे रिवार्ड देण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी दै. जनशक्तिशी बोलतांना दिली. तसेच दंगलीच्या गुन्ह्यात एकूण 250 जण निष्पन्न झाले असून इतरांना फरार घोषित करण्यासह पाहिजे असल्याबाबत न्यायालयाच्या परवानगीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

दोन्ही गटाच्या 500 जणांविरोधात गुन्हा दाखल

शासनातर्फे जनता कर्फ्यूचे आदेश लागू असतांना रस्त्यावर गर्दी केल्याच्या कारणावरुन दोन गटात दंगल झाल्याची घटना 22 रोजी रात्री 8.45 वाजेच्या सुमारास रावेर शहरात शिवाजी चौकात घडली. दोन्ही गटांच्या जमावाकडून नियंत्रण मिळविणार्‍या पोलिसांवर दगड, विटा, काचेच्या बाटल्यांचा वापर करण्यात आल्याने पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. यादरम्यान खाजगी वाहने जाळण्यात येवून पोलिसांचे वाहने, इलेक्ट्रीक डी.पी. तोडफोड करुन नुकसान करण्यात आले. या दंगलीत जखमी यशवंत काशीराम मराठे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोन्ही गटाच्या 300 ते 400 पेक्षा जास्त लोकांविरोधात रावेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फिर्यादी होवून 350 ते 400 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यादरम्यान शहरात दोन दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक छेरींगे दोरजे यांची भेट दिली होती. दंगलीच्या घटनेनंतर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनीही भेट दिली. काही दिवस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके ठाण मांडून होते.

शेतशिवार, जंगलात अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा मुक्काम

संशयितांना अटक करण्याच्या विशेष पोलीस महानिरिक्षक छेरींग दोरजे यांच्या सुचना होत्या. संशयितांच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनानुसार अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्यासह त्यांचे पथक, पोलीस उपविभागीय अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, आरसीपी प्लाटून, क्यआरटी पथक, स्थानिक गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस स्टेशन अशी सर्व यंत्रणा कामाला लागली होती. रात्र दिवस एक करत कर्मचारी मेहनत घेत होते. रात्र, पहाट, किर्र अंधारात विना बॅटरी, जंगल, शेत शिवारात कर्मचारी संशयितांच्या शोधार्थ हिंडत होते. केळीच्या शेतात फिरुन फिरुन संशयितांचा शोध घेवून लपून बसलेल्या संशयितांना अटक करण्याचा अनुभवही यावेळी भाग्यश्री नवटके यांनी सांगितला. एक ते दोन दिवस आहे त्याच ठिकाणी ठाण मांडून भूख, तहान तसेच झोप, विश्रांतीची तमा न बाळगत संशयितांचा शोध घेतल्याचेही ते म्हणाले. अशाप्रकारे आतापर्यंत यागुन्ह्यात 149 संशयितांना अटक करण्यात आली आहे.

इतरांना फरार घोषितची करणार कार्यवाही

गुन्हा दाखल झाल्यानुसार 149 जणांना अटक करण्यात आली आहे. 260 पेक्षा अधिक जण निष्पन्न करण्यात आले आहे. त्यांचा शोध सुरुच आहे. अटकेव्यतिरिक्त इतरांना फरार घोषित करण्यात यावे तसेच पाहिजे (वान्टेड)असल्याबाबत कार्यवाहीसाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात येणार असल्याची माहिती नवटके यांनी दिली. संशयितांना अटक करण्यात कामगिरीत महत्वाची भूमिका निभावणार्‍या एकूण 250 कर्मचार्‍यांचा दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत रिवार्ड देण्यात येणार आहे. यात जिल्हा पोलीस दलातील आरसीपी, क्यूआरटी, स्थानिक गुन्हे शाखा, अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी, स्थानिक कर्मचारी तसेच धुळे एसआरपीएफच्या प्लाटूनचाही समावेश असल्याचे नवटके यांनी सांगितले.