रावेर येथे 7 रोजी धरणे आंदोलन

0

शेतकर्‍यांच्या प्रलंबित प्रश्नी जनसंग्राम विचारणार ‘जाब ’

रावेर- जून महिन्यात वादळी पावसाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या केळीच्या पंचनाम्यांचा अहवाल खुला करावा, शासनाने केळी उत्पादकांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, बोंडअळीने प्रभावीत कापसाचे शासनाने जाहीर केलेले अनुदान सरसकट द्यावे, केळीला विम्याचा लाभ देतांना विमा कंपनीकडून टाकलेल्या जाचक अटी रद्द व्हाव्यात या व अशा विविध शेतकर्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या मंगळवार, 7 जुलै जनसंग्राम बहुजन लोकमंचच्या वतीने रावेर तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

भरपाईबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष -विवेक ठाकरे
जनसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष व निंभोरा (ता.रावेर) येथील माजी उपसरपंच विवेक ठाकरे म्हणाले की, केळी उत्पादकांना नुकसान भरपाई मिळण्याच्या मुद्द्यावर दिरंगाई होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी याबाबत गंभीर नाहीत. शेजारच्याच मध्यप्रदेशातील केळी उत्पादकांना त्या शासनाने एक लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर केलेली असतांना इकडच्या शेतकर्‍यांना महाराष्ट्र सरकारने प्रती हेक्टरी केवळ 18 हजार भरपाई जाहीर करणे म्हणजे शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार आहे. मध्यप्रदेशप्रमाणे एक लाखांची भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

2016 मधील मे हिटच्या नुकसानीचे 11 कोटी मिळणार कधी?
एप्रिल व मे 2016 मध्ये अतिउष्णतेच्या लाटेमुळे केळी करपल्याने रावेर व इतर तालुक्यातील केळीच्या सुमारे 11 कोटींच्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या अहवालावरून तत्कालीन कृषी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी भरपाई देण्याचे आदेश देऊन सव्वा दोन वर्षात दमडी सुद्धा यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मिळालेली नाही. ही रक्कम सुद्धा मिळावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

लोकप्रतिनिधींचा आंदोलनाला पाठिंबा
जनसंग्राम बहुजन लोकमंचचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना शेतकरी आंदोलकांच्या वतीने देण्यात येईल. माजी आमदार शिरीष चौधरी,राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष सोपान पाटील, रावेर तालुका अर्ग्रो डिलर्स असोसीएशनचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे आदींनी धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. रावेर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी मंगळवार, 7 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जनसंग्राम शेतकरी सेलचे रावेर तालुका अध्यक्ष भागवत विठ्ठल महाजन व तालुका सचिव नितीन पाटील यांनी केले आहे.