रावेर लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचाच विजय होणार

0

माजी आमदार संतोष चौधरींचा दावा ; भुसावळ विधानसभेसह रावेर लोकसभेच्या पदाधिकार्‍यांचे तिकीट कापले जाणार ; धुळ्याप्रमाणेच बदल घडणार

भुसावळ- नोटबंदीमुळे सर्वसामान्य बेजार झाले असून लघूउद्योग मोडकळीस आले असून केंद्रासह राज्यातील भाजपा सरकारला आता जनता कंटाळली असून आता बदल निश्‍चित असून आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार दहा हजारांच्या लीडने विजयी होईल, असा दावा माजी आमदार संतोष चौधरी यांनी करीत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. राष्ट्रवादीत घरवापसी झाल्यानंतर चौधरी यांनी प्रथमच शासकीय विश्रामगृहात प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेत संवाद साधला. याप्रसंगी चौधरी म्हणाले की, भुसावळचे आमदार संजय सावकारे, रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट यंदाच्या निवडणुकीत हमखास कापले जाणार असून त्यामुळेच त्यांना बेरोजगारांचे मेळावे, बहिणाबाई महोत्सव घेण्याची गरज पडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भुसावळ पालिकेच्या बाबतीत मोठा कार्यक्रम घेवून लवकरच मोठी घोषणा करणार असून या कार्यक्रमास शरद पवार वा अजित पवार निश्‍चित उपस्थित राहतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

तर अमृत योजनेच्या खोड्यास जिल्हाधिकारीच जवाबदार
भुसावळात मंजूर झालेली अमृत योजना राष्ट्रवादीच्या काळातील असून त्यावेळीदेखील आम्ही काम सुरू करू शकत होतो मात्र त्यासाठी पालिकेला किमान दिडशे कोटी भरावे लागणार होते हा इतका निधी पालिकेकडे नसल्याने योजना पुढे नेण्यात आली नाही मात्र आत्ताच्या सत्ताधार्‍यांनी केवळ पाईपलाईन टाकून बिले काढण्याचा घाट रचला आहे. तापी नदीवर उभारल्या जाणार्‍या बंधार्‍यास जलसंपदा विभागाने विरोध दर्शवला असून आता बंधारा उभारणार कुठे? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित करीत यापूर्वीच आपण जिल्हाधिकार्‍यांना या योजनेसंदर्भात निवेदन दिले आहे. योजनेला आमचा विरोध नाही मात्र शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्यास प्रसंगी जिल्हाधिकार्‍यांना जवाबदार धरून त्यांना न्यायालयात ओढू, असा इशाराही त्यांनी दिला.

धुळ्याप्रमाणेच येथेही घडणार बदल
धुळे महापालिका निवडणुकीत भाजपा विरूद्ध भाजपाचे आमदार असा संघर्ष सुरू असून आगामी काळात भुसावळातही असाच बदल घडेल, असा दावा चौधरी यांनी करीत त्यावेळी कोण-कोण पक्ष बदलेल हेदेखील कळेल, असे त्यांनी सांगत आताच काहींना काँग्रेसमध्ये पाठवण्यात आले असून चाचपणी घेतली जात असल्याची कोपरखळी त्यांनी माजी मंत्री खडसेंचे समर्थक आमीर साहब यांचे नाव न घेता लगावली. भुसावळ विधानसभेची जागा रीपाइंला सोडण्याच्या हालचाली सुरू असून विद्यमान आमदारांप्रमाणे रावेर लोकसभेचे तिकीट रक्षा खडसे यांना निश्‍चित मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला. रेल्वे जागेवरील अतिक्रमण तुटले तेव्हा कुठे खासदार होत्या? असा प्रश्‍न उपस्थित करीत त्यांनी रेल्वेच्या तोडलेल्या जागेवरील मलदा हटवण्याचे कामदेखील आता भाजपा पदाधिकारी करीत असल्याचा आरेाप केला.

ईव्हीएमकडे ठेवा लक्ष तर होवू शकतो घोटाळा !
मोंदीच्या 15 लाख बँक खात्यात येत असल्याच्या घोषणेची फिरकी घेत माजी आमदार चौधरी यांनी ईव्हीएम घोटाळ्यावर बोट ठेवले. भुसावळातील गोदामात ठेवलेल्या ईव्हीएमचा संदर्भ देत कार्यकर्त्यांनी सहज म्हणून गोदामाकडे चक्कर मारून काही घोटाळा तर होत नाही ना ? हे तपासण्याच्या सूचना करीत सत्ताधारी सरकार काहीही करू शकते, अशी गुगलीही टाकत बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात, असे सांगितले. माजी खासदार उल्हास पाटील यांचे नाव न घेता ते म्हणाले की, माझ्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने अनेकांची पंचाईत झाली आहे मात्र जिल्ह्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादीच्याच असून तेथे राष्ट्रवादीच विजयी होणार आहे तर रावेरची जागा 10 हजारांच्या मताने निवडून आणू, असे त्यांनी सांगत पक्षश्रेष्ठी या जागेबाबत जे आदेश देतील तेदेखील आपल्यास मान्य राहिल, असे नमूद केले.

दुष्काळग्रस्तांना द्यावा निधी -सुनील वाघ
प्रदेश निरीक्षक सुनील वाघ (धुळे) म्हणाले की, कामांचे निरीक्षण करून संघटनात्मक बांधणी होते वा नाही याबाबत पक्षाला अहवाल देणार असून सक्षम विरोधी पक्षामुळे आता रचनात्मक काम करणे गरजेचे आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस साध्या पद्धत्तीने साजरा करण्यासोबतच हा निधी ‘चला देऊया मदतीचा हात’ या उपक्रमांतर्गत दुष्काळग्रस्तांना देण्याचे त्यांनी आवाहन केले.

संतोष चौधरीच होणार खासदार -रवींद्र पाटील
जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांनी रावेर लोकसभेत संतोष चौधरींचाच विजय होणार असल्याचे सांगत त्यांच्या पक्ष प्रवेशाने कार्यकर्त्यांमध्ये आशादायी चित्र निर्माण झाल्याचे सांगितले. टंचाईग्रस्त गावांना टँकर सुरू करण्यासह शेतकर्‍यांना बियाणे वाटप करू, असे त्यांनी सांगितले. वरणगावचे गटनेता राजेंद्र चौधरी यांनी सत्ताधार्‍यांना जनता आता कंटाळली असून परीवर्तन निश्‍चित होणार असल्याचे सांगत खासदारांवर टिका केली. शहराध्यक्ष शेख पापा शेख कालू यांनीही मनोगत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
बैठकीला शहराध्यक्ष शेख पापा शेख कालू, किसान सेल तालुकाध्यक्ष शशीकांत पाटील, युवकचे तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, अल्पसंख्यांक आघाडीचे रईस खान, बाजार समिती उपसभापती अशोक पाटील, शेतकी संघ चेअरमन पंढरीनाथ पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख नाना पवार, जिल्हा सदस्य विलास पाटील, बाजार समिती संचालक गजानन सरोदे, सुभाष पाटील, युवराज पाटील व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.