नोकरीसाठी दाखल्याचा वापर करण्याची मनीष महाजन यांची माहिती
रावेर- शहरातील चहा विक्रेता मनीष महाजन या तरुणाला शुक्रवारी प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या हस्ते मराठा जातीचा दाखला देण्यात आला. मनीष बारावीतील शिक्षण घेणारा विद्यार्थी असून घराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी चहा विक्री करतो. जातीचा दाखल्याचा नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले.
रावेर तहसीलमध्ये दाखल्यांचे वाटप
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यात 58 मोर्चे निघाले तर सुमारे 60 जणांनी आरक्षणासाठी बलिदान दिले. याचीच शासनाने दखल घेत घोषणा केली व मराठा बांधवांना शैक्षणिक नोकरीकामी 16 टक्के आरक्षण देण्यात आले. या अनुषंगाने 14 डिसेंबर रोजी रावेर तहसील कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्र (सेतु) मार्फत 12 रोजी दाखल केलेल्या प्रकरणानंतर दोन दिवसात दाखला तयार करून मनिष लक्ष्मण महाजन उर्फ गणेश चहावाले व सेतु सुविधा कक्षातील कर्मचारी दिव्यांग कमलाकर विश्वनाथ चौधरी या दोन युवकांना उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या ऑनलाईन स्वाक्षरीने देण्यात आला. प्रसंगी प्रांताधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार विजयकुमार ढगे, निवासी नायब तहसीलदार कविता देशमुख, लिपिक प्रवीण पाटील, सेतु कर्मचारी धनराज घेटे, प्रदीप महाजन, महेंद्र वानखेडे, अतुल चौधरी, प्रशांत महाजन, भावेश तायडे, पत्रकार दीपक नगरे, पत्रकार राजेंद्र अटकाळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.