राष्ट्रपतीपदासाठी थावरचंद गेहलोत यांचे नाव आघाडीवर

0

नवी दिल्ली । जुलैमध्ये होणार्‍या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संभाव्य दावेदारांमध्ये मोदी सरकारमधील एका मंत्र्याच्या नावाची मोठी चर्चा सध्या सुरू आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यात सोमवारी नागपूरमध्ये बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रपतीच्या संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा झाली.

भाजप केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांना निवडणुकीत उतरवू शकते, असे वृत्त ‘एबीपी न्यूज’ने दिले आहे. गेहलोत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. प्रारंभी एखाद्या बिगर राजकीय व्यक्तीला निवडणुकीत उतरवून विरोधकांनाही पाठिंबा देण्यास भाग पाडण्याचा भाजपचा प्रयत्न होता. परंतु, पाच राज्यांतील निवडणुकीनंतर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आवश्यक मते असल्याचा विश्वास प्राप्त झाल्यानंतर भाजपला राष्ट्रपतीपदी पक्षाचाच सदस्य हवा आहे. 69 वर्षीय थावरचंद गेहलोत हे मध्य प्रदेशमधील उज्जैन येथील आहेत. त्यांनी 80 च्या दशकात राजकारणात प्रवेश केला होता.

त्यांनी तीन वेळा आमदार आणि मध्य प्रदेश सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. 1996 ते 2009 पर्यंत सलग 4 वेळा ते शाजपूर राखीव मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. 2009 मध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांना 2012 मध्ये मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. ते पक्षाच्या संसदीय समितीचे सदस्य आहेत.

संघाचे प्रचारक म्हणून काम पाहिले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले थावरचंद गेहलोत हे भाजपचे राष्ट्रीय सचिव, महासचिव आणि उपाध्यक्षही राहिले आहेत. संघटनेत मजबूत पकड असलेले गेहलोत यांना संघाची पसंती असल्याचे मानले जाते.

सुमित्रा महाजन, द्रौपदी मुर्मू स्पर्धेत
थावरचंद गेहलोत यांच्याशिवाय लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याही नावाचा एनडीएच्या उमेदवारांच्या यादीत समावेश आहे. यामध्ये झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांचेही नाव घेतले जात आहे. जर मुर्मू राष्ट्रपती बनल्या तर आदिवासी समाजाच्या त्या पहिल्याच महिला राष्ट्रपती असतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर एनडीए आपल्या उमेदवाराची घोषणा करेल आणि जर विरोधकांनीही एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर जुलैमध्ये सर्वसंमतीने राष्ट्रपती निवडले जातील.