राष्ट्रपतीपदासाठी भाजपविरोधात एकजूट

0

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशसह अनेक राज्यातील निवडणुकांमधील पराभवानंतर भाजपविरोधी पक्षांना अस्तित्वाची जाणीव झाली आहे. त्यामुळेच एकमेकांचे तोंडही न पाहणारे हे पक्ष राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकाच मंचावर आणि तेही काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र आले आहेत. त्यामुळे भाजप आणि पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करण्यासाठी आगामी काळात देशात तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता असून त्याची सुरुवात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.

सोनिया गांधी यांनी भाजपविरोधी राजकीय पक्षांची घेतली बैठक
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपविरोधी राजकीय पक्षांची बैठक बोलावली होती. यावेळी सोनिया गांधी आणि त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्या कुशल नेतृत्वामुळे एकमेकांचे तोंडही न पाहणारे राजकीय पक्ष या बैठकीत सहभागी झाले आहेत. या बैठकीला बसप अध्यक्षा मायावती, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी उपस्थित होते.

लालू, अखिलेश, ममता, शरद पवार उपस्थित
त्याशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, लालूप्रसाद यादव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते उमर अब्दूल्ला, जेएमएम, केरळ काँग्रेस, नॅशनल कॉन्फ्रन्स, डीएमके, एआययूडीएफ, आरएसपी, ऑल इंडिया मुस्लिम लीग, सीपीएम, सीपीआय आणि जेडीएस आदी पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आले नाहीत. त्यांच्याऐवजी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव उपस्थित होते. लालूप्रसाद यादव बैठकीला आल्यामुळे नितीश कुमार आले नसावे असा कयास वर्तवला जात होता. मात्र जेडीयू नेता पवन वर्मा यांनी या आरोपात तथ्य नसल्याचे सांगितले. दरम्यान आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. तर अखिलेश यादव या बैठकीला सुमारे 20 मिनिटे उशिरा पोहचले. ममता बॅनर्जी तर काँग्रेस नेत्यांच्याही आधी पोहचल्या होत्या.

एक उपसमिती स्थापन करणार
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत सर्वसहमती व्हावी म्हणून सोनिया गांधी यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत एक उपसमिती स्थापन केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान बहुतेक राजकीय पक्ष या बैठकीला आल्याने काँग्रेससाठी ते चांगले संकेत मानले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात देशात तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता राजकीय विश्‍लेषक वर्तवत आहेत.