नवी दिल्ली : देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी शपथ घेतली. के. आर. नारायणन यांच्यानंतर देशातील सर्वोच्च घटनात्मक पदी विराजमान झालेले कोविंद हे दुसरेच दलित राजकारणी. कानपूरमधील छोट्या गावातील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले कोविंद यांनी दोनदा लोकसभा निवडणुकीत नशीब अजमावून पाहिले होते. मात्र, त्यात ते पराभूत झाले. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील एकनिष्ठ, जुने-जाणते स्वयंसेवक म्हणून भाजपने त्यांना दोनदा राज्यसभेवर संधी दिली. आता बिहारच्या राज्यपालपदावरून थेट राष्ट्रपतीपदी वर्णी लागून कोविंद यांना संघानिष्ठेचे फळ मिळाले.
सात भावात सर्वात धाकटे
गेल्या दोन तपांहून अधिक काळ 71 वर्षीय कोविंद यांनी सार्वजनिक जीवनात शांत स्वभाव, पक्षनिष्ठा आणि कर्तव्यनिष्ठेची छाप उमटवली आहे. कोविंद यांच्या पत्नी सविता या गृहिणी आहेत. त्यांचे पिता स्व. मैकूलाल एक छोटेसे दुकान चालवायचे. त्यांची आई स्व. फूलवती याही घरगृहिणी होत्या. रामनाथ कोविंद हे एकूण पाच भाऊ व चार बहिणीतील सर्वात छोटे!
कोविंदांची कन्या, माहितीच नाही
साधेपणाचा त्यांचा गुण कुटुंबात पुरेपूर पाहायला मिळतोय. त्यांची मुलगी स्वाती ऑस्ट्रेलिया, युरोप आणि अमेरिकेसारख्या लांबच्या मार्गावर उडणाऱ्या ‘एअर इंडिया’च्या बोईंग 777 आणि 787 एअरक्राफ्टमध्ये एअर होस्टेस आहे. तर मुलगा प्रशांतही एअरलाईन्स कंपनीत काम करतो. दोघा मुलांनी आजपर्यंत आपल्या वडिलांच्या पदाचा स्वत:च्या हितासाठी कधीही वापर केलेला नाही. स्वाती ही रामनाथ कोविंद या राजकीय नेत्याची, बिहारच्या राज्यपालांची मुलगी आहे, हे आजवर कधीही एअर इंडिया स्टाफला माहिती नव्हते. आता मात्र, मोदींशी भेटीची छायाचित्रे छापून आल्यानंतर राष्ट्रपतींची ही लाडली लेक तिच्या साधेपणामुळे कौतुकाचा विषय ठरली आहे.
कुटुंबाला नाकारला होता प्रवेश
भाजपाने राष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित करण्याच्या तीन आठवडे आधीच सिमला रीट्रेट या राष्ट्रपती हॉलिडे होममध्ये पूर्वपरवानगी घेतली नसल्याकारणाने कोविंद आणि त्यांच्या कुटुंबाला प्रवेश नाकारण्यात आला होता. तेव्हा ते तिथून माघारी फिरले होते. त्यांच्या नशिबाने आता हे कुटुंब कधीही सिमला रीट्रेटमध्ये, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय जाऊ शकते.
कोविंद यांचे पुत्र प्रशांत यांनी वीस वर्षांपूर्वी गौरीशी घरच्या संमतीने प्रेमविवाह केला होता. या विवाहाला नरेंद्र मोदी उपस्थित होते. 2-3 दिवसांपूर्वीच मोदींनी प्रश्नात-गौरीच्या लग्नातील फोटो ट्विट कला होता. गौरी या शिक्षिका आहेत. त्यांना दोन अपत्ये आहेत. 1990 मध्ये घाटमपूर तर 2007 मध्ये उत्तरप्रदेशातीलच भोगनीपूर येथून कोविंद हे लोकसभेची निवडणूक हरले होते. मात्र, 1994 ते 2000 तक आणि 2000 ते 2006 अशा दोन टर्म ते राज्यसभा सदस्य होते. ऑगस्ट 2015 पासून बिहारचे राज्यपाल म्हणून ते कार्यरत होते.
केंद्र सरकारचे वकील
कानपूर विद्यापीठातून कॉमर्स आणि कायद्याची पदवी घेतलेले रामनाथ कोविंद केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या जवळचे मानले जातात. लखनौमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आणि कोलकात्याच्या ‘आयआयएम’मध्ये ते बोर्ड मेंबर होते. दिल्ली हायकोर्ट, तसेच सुप्रीम कोर्टात त्यांनी सुमारे 16 वर्षे वकिली केली आहे. त्यात 1977 ते 1979 दरम्यान ते दिल्ली हायकोर्टात केंद्र सरकारचे वकील होते. मोरारजी देसाई सरकारात कोविंद यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.
कोळी समाजाचे अध्यक्ष
रामनाथ कोविंद हे अखिल भारतीय कोळी समाजाचेही बराच काळ अध्यक्ष होते. 1980 ते 1993 दरम्यान केंद्र सरकारच्या स्टँडिंग कौन्सिलसह विविध संसदीय समित्यांवरही त्यांनी काम केले आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती कल्याण, गृह, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, कायदा आणि न्याय या समित्यांचा समावेश आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणूनही जबाबदारी कोविंद यांनी सांभाळली. 1998 ते 2002 या काळात भाजप दलित मोर्चाचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले. उत्तर प्रदेशात मायावतींना आव्हान देण्यासाठी भाजपने दलित समाजातील कोविंद यांना मैदानात उतरवले होते. त्यांनी 2002 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भाषण केले असून विविध देशांना भेटीही दिल्या आहेत.
मुलींच्या शिक्षणावर विशेष भर
मुलींच्या शिक्षणावर कोविंद यांचा विशेष भर आहे. राज्यसभेत त्यांनी अनेकदा याविषयी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी आपला सर्वच खासदार निधी मुलींच्या शाळेत सुविधा पुरविण्यावर खर्च केला आहे. उत्तर प्रदेशातील बहुतांश शाळांमध्ये त्यांच्या खासदार निधीतून काम झाल्याचे फलक लागले आहेत. “पढ़ी लिखी लड़की रोशनी है घर की” हेच त्यांचे घोषवाक्य पुढे “बेटी बचाओ बेटी पढाओ”ची प्रेरणा बनल्याचे सांगितले जाते.
कचोरी अन खीर
रामनाथ कोविंद यांना लहानपणी लल्ला म्हणत. त्यांना कचोरी आणि ऊसाच्या रसाची खीर विशेष आवडते. ते पाचवीत असताना आगीत जाळून आईचा मृत्यु झाला. ते पाचवीपर्यंत गावातच छप्पर नसलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले. त्यानंतर 20 किलोमीटरवरील झिंझक गावात त्यांचे पुढील शिक्षण झाले. कोरी (कोळी) दलित जमातीत जन्मलेल्या रामनाथ गोविंद यांचे बहुतांश नातेवाईक याच गावात राहतात.