नवी दिल्ली – राष्ट्रपती भवनात कोणताही धार्मिक विधी साजरा न करण्याच्या आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यावर्षी इफ्तार पार्टीच्या आयोजन करणार नाहीत. याबाबत राष्ट्रपती कोविंद यांचे माध्यम सचिव अशोक मलिक यांनी माहिती दिली.
मलिक यांनी सांगितले, की राष्ट्रपतींनी आपला कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनासारख्या सार्वजनिक इमारतींमध्ये करदात्यांच्या पैशावर कोणताही धार्मिक कार्यक्रम साजरा न करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रपती कोविंद दिवाळी, ख्रिसमस आणि होळी असा कोणताही धार्मिक कार्यक्रम साजरा करत नाही, मात्र यावेळी ते नागरिकांना शुभेच्छा देतात.
हा निर्णय धर्मनिरपेक्ष राज्याच्या मुल्यांना अनुसरून घेतला असून सर्व धर्माच्या कार्यक्रमांना लागू आहे, मग तो धर्म कोणताही असो. प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर इफ्तार पार्टीच्या आयोजनाला पुन्हा सुरुवात झाली होती. त्यांच्यानंतर आलेल्या तत्कालिन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देखील ही प्रथा सुरू ठेवली होती. इफ्तार हे मुस्लीम बांधवांकडून रमजान महिन्यात सायंकाळी सुर्यास्तानंतर उपवास सोडण्यासाठी घेतले जाणारे जेवण आहे.