राष्ट्रवादीची उमेदवारी विलास लांडे कि डॉ. अमोल कोल्हे यांना सस्पेन्स कायम!

0
भोसरी – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिरुर लोकसभा मतदार संघातील नारायणगाव आणि भोसरीत झालेल्या मेळाव्यातून पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर केला जाईल अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. परंतु, दोन्ही मेळाव्यात उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची निराशा झाली. डॉ. अमोल कोल्हे उमेदवार असल्याचे संकेत दिले. परंतु, तुर्तास दरी अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर केली नाही. सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार विलास लांडे कि डॉ. अमोल कोल्हे असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच खासदार झाला पाहिजे. यासाठी पक्षाने कंबर कसली आहे. यावेळी तगडा उमेदवार देण्याची व्हिवरचना आखली आहे. शिवसेनेतून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले. कोल्हे हेच उमेदवार असतील असे बोलले जाऊ लागले आहे. पक्ष प्रवेशानंतर लगेच तीन दिवसांनी शिरुर मतदार संघात कोल्हे यांच्यासोबत जाहीर मेळावे सुरु केले.

या मेळाव्यात सर्वांत शेवटी कोल्हे यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली.  त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचे पक्षाने संकेत दिली असल्याची जोरदार चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. डॉ. कोल्हे हे देखील विद्यमान खासदार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यामुळे कोल्हे हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.

भोसरीचे माजी आमदार विलास लांडे देखील लोकसभेसाठी तीव्र इच्छूक आहेत. त्यांनी दोन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली होती. मतदार संघात दौरे सुरु केले होते. नव्या-जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेण्यावर भर दिला होता. भोसरीतील काल झालेल्या मेळाव्यात देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी करत लांडे यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली.

परंतु, या उत्साही कार्यकर्त्यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडेबोल सुनावले. आता बेंबिच्या देठापासून घोषणा देतात, 2009 च्या लोकसभा निवडणुकीला कुठे गेला होतात? असा सवाल करत घोषणा देऊ नका नाहीतर तिकीटच कापतो असे दम भरला होता असे सांगत 2009 ला उमेदवारी दिली होती. याची आठवण करुन दिली. शिरुर मतदार संघाचा पवार साहेब आढावा घेत आहे. तेच उमेदवार ठरविणार आहेत.  तुमचा सांगावा पवार साहेबांना सांगतो, असेही ते म्हणाले.