नवी मुंबई – निरंजन डावखरे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी एक हादरा बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील पावसाळी अधिवेशनाआधी भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. नरेंद पाटील यानी मात्र आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही. प्रसाद लाड, निरंजन डावखरे यांच्यानंतर पाटील भाजपात जाणार, अशा बातम्या गेल्या काही महिन्यापासून समोर येऊ लागल्या होत्या, मात्र अद्याप पाटील भाजपात जाणार हे निश्चित झालेले नाही.
अधिवेशनापूर्वी प्रवेश करण्याची शक्यता
उत्कृष्ठ संघटक आणि उत्तम वक्ता ही पाटील यांची जमेची बाजू आहे. वडिलांची प्रथा पुढे चालवत पाटील यांनी माथाडी कामगार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. परिणामी स्वपक्षातील नेत्यांचा नाराजीला त्याना सामोरे जावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील यांच्यातील वाद सर्वज्ञात आहे.
26 सेप्टेंबर 2016 रोजी माथाडी कामगार मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रमुख पाहुणे बोलावून पाटील यानी पहिल्यांदा आपली नाराजी काही न बोलता उघड केली . तेव्हापासून नरेंद्र पाटील भाजपमध्ये जाणार अशा आशयाचा बातम्या येऊ लागल्या आहेत. माथाडी कामगारांची संख्या ही जवळपास 60 हजार एवढी आहे, यातील मोठा वर्ग हा नरेंद्र पाटील यांचे वडील स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना मानणारा वर्ग आहे. नरेंद्र पाटील भाजपात जाणार या सध्यातरी जर तरच्या गोष्टी आहेत, मात्र हे सत्यात उत्तरल्यास भाजपाला पश्चिम महाराष्ट्रात मोठा चेहरा मिळेल यात वाद नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसणार हे निश्चित.