पुणे । महापालिकेच्या बांधकाम विभागातील एका अधिकार्यास नगरसेविकेने बुधवारी (दि. 29) दमबाजी केली. नगरसेविकेच्या पतीने आणि कार्यकर्त्यानी अधिकार्यास अरेरावी केली. यावेळी नगरसेविकेच्या एका कार्यकर्त्यांने या अधिकार्याच्या कार्यालयातील खुर्चीला लाथ मारली. तोडफोड, अधिकार्यांना दमबाजी असे प्रकार पालिकेत होत असल्यामुळे अधिकार्यांना संरक्षणाची गरज आहे असे सांगत या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज झालेल्या मुख्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कमांडोच्या वेशात दाखल झाले. विरोधकांच्या आंदोलनाचा पावित्रा पाहून सत्ताधारी भाजपने आजची खास सभा अक्षरशः काही मिनिटांत गुंडाळली.
घटनेची तक्रार दाखल केली नाही
महापालिकेच्या बांधकाम विभागातील एका अधिकार्याकडे बुधवारी भाजपच्या एक नगरसेविका काही कामानिमित्त आल्या होत्या. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे पती आणि कार्यकर्त होते. एका कामावरून संबधित अधिकारी आणि नगरसेविका यांच्यामध्ये वाद झाला. त्यामुळे संबधित नगरसेविकेने या अधिकार्यास दमबाजी केली. तर नगरसेविकेच्या पतीने आणि कार्यकर्त्यांनी या अधिकार्याला अरेरावी केली. यातील एका कार्यकर्त्याने संबंधित अधिकार्याच्या कार्यालयातील खुर्चीला लाथ मारली. यावेळी कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी होती. मात्र या घटनेेेची कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नाही किंवा या घटनेचा खुलासा प्रशासनाकडून देण्यात आला नाही.
अधिकार्यांना आता दोन कमांडो
चेतन तुपे म्हणाले, महापालिकेत कधी तोडफोड, लाथाबुक्क्यांनी मारहाण, खुर्च्यांची फेकाफेक, निविदांमध्ये रिंग तोडल्याबद्दल दमबाजी, असे अनेक प्रकार होत आहेत. त्यामुळे अधिकार्यांना आता दोन कमांडो स्वसंरक्षणासाठी घेऊन फिरावे लागणार आहे. सगळेच अधिकारी आयुक्तांसारखे जिममध्ये जात नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, विरोधकांच्या आंदोलनाचा पावित्रा पाहून एकात्मिक सायकल धोरण आणि सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य उपविधीला मान्यता देण्यासाठी बोलावलेली खास सभा तहकूब करण्यात आली.