रायगड जिल्ह्यातील कोंढाणा धरण प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. या धरण बांधकाम घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने तीन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तत्कालीन पाटबंधारे मंत्री सुनील तटकरे यांना या प्रकरणात आरोपी करणार का? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. पण तटकरे या प्रकरणातून सुटण्यासाठी धडपड करत आहेत. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे उल्हास नदीवर कोंढाणे धरण बांधण्यास कोकण पाटबंधारे विभागाने 19 मे 2011 रोजी परवानगी दिली होती. मात्र, पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी नियम धाब्यावर बसवून तातडीने निविदा मागवल्या. त्यात एफ.ए.कासत्राक्षण आणि एफ.ए. एन्टप्रायजेस या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या कंपन्या एकच होत्या. अटी आणि शर्तीची पूर्तता नसताना एफए कास्त्रक्सन कंपनीला काम देण्यात आले. सरकारकडून सुधारित मान्यता न घेताच याच कंपनीला 271 कोटींचे कंत्राट देण्यात आले. याप्रकरणी जलसंपदा विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक डी.पी. शिर्के, मुख्य अभियंता बा.भा. पाटील, ठाणे विभागाचे अधीक्षक अभियंता आर. डी. शिंदे, मुख्य अभियंता प्र.भा. सोनावणे. कार्यकारी अभियंता अ.प. साळुंखे.कार्यकारी अभियंता रिठे आणि एफ.ए.इंटर्प्रीसेस चा मालक निसार खत्री यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, याला मंजुरी देणारे तत्कालीन पाटबंधारे मंत्री सुनील तटकरे यांना चौकशी करून सोडून देण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली, पण तटकरे यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही याचे उत्तर मुख्यमंत्रीच देऊ शकतील.
सरकारच सिंचन घोटाळ्याबाबत गंभीर नाही. भाजपनेते निवडणुकीच्या अगोदर सिंचन घोटाळ्यातील नेत्यांना तुरुंगात पाठवण्याची भाषा करत होते. पण अजितदादा आणि तटकरे यांची फक्त चौकशी झाली. गुन्हे मात्र अभियंत्यांवर दाखल झाले. दमानिया बाईंनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला नसता, तर एसीबीमार्फत चौकशीही झाली नसती. किरीट सोमय्या यांनी सिंचन घोटाळ्याबाबत याचिका दाखल केली होती.त्या याचिकेचे काय झाले? कुणाच्या सांगण्यावरून ही याचिका मागे घेतली हे सोमय्यांनी स्पष्ट करायला हवे. सुनील तटकरे आणि अजितदादा पवारांचेही वाजले आहे. या प्रकरणात माझा काही संबंध नाही आपण दादांच्या सांगण्यावरून हे केले आहे हे ते खासगीत सांगत फिरत आहेत. अजितदादा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे संबंध मधुर आहेत. तटकरे तर विरोधी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.विधान परिषदेत जाहीरपणे मुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमने उधळत असतात. त्यामुळेच चौकशी होऊन आरोप पत्र दाखल झाले, तरी सुनील तटकरे यांचे नाव नाही.त्यामुळे या प्रकरणात बिचारे अधिकारी बळी जाणार एवढे निश्चित. अधिकार्यांनी आता तोंड उघडायला हवे. मंत्र्यांच्या मर्जीशिवाय एवढी मोठे कंत्राटी दिली जातात का? अधिकारी बोलले तरच वस्तुस्थिती समोर येईल. नाहीतर मुख्यमंत्र्यांना अजितदादा आणि तटकरे दोघांनाही वाचवायचे आहे. एसीबीच्या चौकशीत या दोघांचा सहभाग समोर आला असेल, पण हे गृहखात्याच्या अखत्यारीत असल्याने सत्य बाहेर येणार नाही.
राणेंचा राडा
नारायण राणे यांनी भाजप प्रवेशापूर्वीच राडा सुरू केला आहे. नारायण राणे हे राहुल गांधींच्या नांदेडमधील मेळाव्याला न जाता कोकणातील आपल्या समर्थकांच्या बैठकीत गुंतून राहिले. यापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वीही त्यांनी शिवसेनेविरोधात राडे केले. त्यावेळी काँग्रेसवाले आनंदात हे राडे एन्जॉय करत होते. आता मात्र त्यांनी पेरलेले उगवले आहे. कोकणात खासदार हुसेन दलवाई यांनी पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून बैठक घेतली. या बैठकीलाच राणे यांनी आक्षेप घेतला मी अजून काँग्रेसमध्ये असल्याचा ते दावा करत आहेत. मग नांदेडला का गेले नाहीत. काँग्रेसला बैठक घेण्याचा अधिकार आहे की नाही, हे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ठरवतील त्यासाठी राड्याची गरज काय? साधनसूचिता मानणार्या भाजपला ही राडा संस्कृती चालणार आहे का? आता भाजपही हे राजे एन्जॉय करत असेल, पण भविष्यात त्यांनाही हे सहन करावे लागेल.
– नितीन सावंत
सहसंपादक, जनशक्ति
9892514124