राष्ट्रवादीच्या गोटात गेला शेकाप

0

भाजप-शिवसेना युती नसल्यास चुकतील सध्याचे विजयाचे अंदाज

राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक पोषक वातावरण

बापू जगदाळे

पिंपरी-चिंचवड : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती होणार नसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्या अनुशंगाने युती न झाल्यास मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घडाळ्याचा आवाज ऐकायला नाही मिळाला तर नवलच म्हणावे लागेल. कारण आता राष्ट्रवादीबरोबर शेतकरी कामगार पक्षाची आघाडी झाली असल्यामुळे विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मागील वेळी राष्ट्रवादीच्या उपर्‍या उमेदवाराने देखील या मतदारसंघातून दोन लाख मते मिळवली होती. तसेच 2014 च्या निवडणुकीत शिवसेना व भाजप युती असल्याने शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचा विजय सोपा झाला होता. मात्र, सध्या भाजपाच्या विरोधात केंद्राबरोबर राज्यात देखील नाराजीचे वातावरण आहे. खुद्द त्यांचा मित्र पक्षच आता भाजपाला एक नंबरचा शत्रु मानू लागला आहे. तसेच त्यांच्या विरोधात देखील यापुर्वीच प्रचारही सुरु केला आहे. या सर्व घटनाक्रमामुळे भाजप व शिवसेना यांची युती होणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. जर शिवसेना व भाजपा विरोधात लढली तर मतविभागणीचा फायदा हा राष्ट्रवादीलाच होण्याची दाट शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादीचा उमेदवार हा जर पिंपरी चिंचवडचा असल्यास या दोघांनाही मतविभागणीचा फटका बसून त्याचा फायदा सरळ राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होऊ शकतो, हे सरळ व साधे गणित आहे. त्या दृष्टीने शरद पवार यांनी देखील मावळ लोकसभा मतदारसंघात त्या प्रकारची समिकरणे जुळवण्यास सुरवात केली आहे.

वाघेरे यांना ग्रीन सिग्नल?

2014 च्या मावळ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे येथील उपरे उमेदवार व विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई मिलींद नार्वेकर यांना राष्ट्रवादीने येथून उमेदवारी दिली होती. पण मोदी लाटेत देखील नार्वेकरांनी दोन लाखाच्या आसपास मते घेतली होती. तर लक्ष्मण जगताप हे शेकापच्या पाठींब्यावर तसे अपक्षच असूनही दुसर्‍या क्रमांकावर होते. त्यामुळेच श्रीरंग बारणे यांचा विजय सुलभ झाला होता. आता परिस्थिती पुर्णपणे बदलली असून शेकापने राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. जगताप आता भाजपाचे आमदार आहेत. तर शिवसेनेने युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने आता शहरातील स्थानिक व पक्षाचे शहराध्यक्ष माजी महापौर संजोग वाघेरे यांना मावळच्या निवडणुकीत उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. त्या अनुशंगानेच वाघेरे यांनी देखील शरद पवार यांच्या उपस्थितीत मोठा कामगार मेळावा यशस्वीपणे आयोजीत केला होता. या सर्वच बदलत्या समिकरणामुळे राष्ट्रवादीची ताकद आता वाढली असून घाटाखालून देखील शेकाप, कॉग्रेस यांची मदत राष्ट्रवादीला मिळणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या घडळ्याला देखील आता संधी उपलब्ध झाली आहे.

शेकापची भूमिका निर्णायक

मावळ लोकसभा मतदार संघात घाटाखालील पनवेल, उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघ येतात. या तिन्ही मतदारसंघात शेकापाची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. तसेच हीच ताकद मागील वेळी जगतापांच्या पाठीमागे होती म्हणूनच जगताप यांनी अशक्य असे धाडस करुन बारणे यांना घाम फोडला होता. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात शेकापाची ताकद निर्णायक असणार आहे. त्यामूळे राष्ट्रवादीला देखील आता विजयाची समसमान संधी तयार झाली आहे.