राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने अभियंत्याला फासले काळे

0

वर्षभरापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 काळभोरनगर, चिंचवडस्टेशन, दत्तवाडी, आकुर्डी गावठाण परिसरातील पाणीपुरवठा गेल्या वर्षभरापासून विस्कळीत झाला आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांकडे तक्रार करुनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांनी ‘अ’ क्षेत्रिय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला काळे फासले आहे. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.

पाणीपुरवठा कमी दाबाने
नगरसेवक जावेद शेख यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरापासून काळभोरनगर, चिंचवडस्टेशन, दत्तवाडी, आकुर्डी गावठाण परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. काही भागात पाणीपुरवठाच होत नाही. पाणी आले तरी अत्यंत कमी दाबाने येत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रासले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठ्याबाबत अधिकार्‍यांकडे वारंवार तक्रारी केल्या. परंतु, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. प्रशासन विनाकारण नागरिकांना वेठीस धरत आहे.

पाणीपुरवठ्याबाबत वारंवार तक्रारी करुन देखील दुर्लक्ष केले जात होते. पाणीपुरवठ्याबाबत आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पाणीपुरवठा कधी सुरु होईल, अशी विचारणा केली असता अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत होते. यामुळे ‘अ’ क्षेत्रिय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता सुशीलकुमार लवटे यांना जावेद शेख यांनी प्रभागातील नागरिकांसोबत काळे फासले आहे. नागरिकांच्या तावडीत सोडले असते तर संतापलेल्या नागरिकांनी या अधिकार्‍याला चोप दिला असता असेही, शेख म्हणाले.