राष्ट्रवादीच्या नेत्या ज्योती पावरांच्या मुलाची आत्महत्या

0

धुळे । जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांच्या तरुण मुलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मयत मुलाचा उद्या दि. 18 रोजी वाढदिवस होता. धुळे शहराच्या देवपूर भागातील अभियंता नगरात ज्योती पावरा यांचे निवासस्थान आहे. त्यांचा मुलगा निकेत सुनील पावरा (वय 17) हा जयहिंद महाविद्यालयात 11 वीच्या विज्ञान शाखेत शिकत होता. मध्यरात्रीनंतर केव्हातरी निकेतने त्याच्या खोलीतील सिलींग फॅनला दोर बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. आज सकाळी सुनिल पावरा हे उठल्यानंतर मुलगा निकेत का उठला नाही म्हणून पाहण्यासाठी ते त्याच्या रुममध्ये गेले. त्यावेळी निकेत हा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभरात हल्लाबोल आंदोलन राबविण्यात येत असून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मयत निकेतची आई ज्योती ह्या वैजापूर येथे गेल्या होत्या. त्यांना घटना कळताच त्या ताबडतोब धुळ्याकडे निघाल्या.

नाराज असल्राने आत्महत्राची चर्चा
निकेत याचा दि. 18 रोजी वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून आई-बाबांनी मोटरसायकलही बुक केली होती. मात्र, याच कारणावरुन त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्याला दुसर्‍या कंपनीची मोटरसायकल पाहिजे होती. पसंतीची मोटरसायकल बुक न केल्याने तो नाराज होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज लावला जात आहे. मात्र, निकेतच्या मृत्यूमुळे संपूर्ण धुळे शहरात, राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्याच्या आत्महत्येची वार्ता कळताच अनेकांनी त्याच्या घरी धाव घेतली. मयत निकेत याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिरे मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्याठिकाणी देखील प्रचंड गर्दी झाली होती.