राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आजपासून भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक

0

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची दोनदिवशीय बैठक बुधवार (दि.26)पासून पिंपरी-चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात सुरु होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू यांच्यासह पक्षाचे सुमारे 500 नेते, पदाधिकारी या बैठकीला हजर राहतील, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांनी दिली. तथापि, काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल त्यांनी मौन पाळले. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. या शहरात प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेऊन भाजपने एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. गेल्या तीन दशकानंतर पहिल्यांदाच भाजपची या शहरात बैठक होत आहे. यापूर्वी 1980च्या दशकात प्रदेश कार्यकारिणीची बैठक या शहरात झाली होती.

राणेंच्या पक्षप्रवेशाची अनिश्‍चितता?
नुकत्याच झालेल्या पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारत दणदणीत विजय मिळवला होता. पुण्यात 162 पैकी 98 जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली; तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये 128 पैकी 77 जागा जिंकत एकहाती सत्ता हस्तगत केली आहे. राज्यातील आगामी निवडणुकांसाठी पक्षाची ध्येयधोरणे, पक्षविस्तारासाठी नेत्यांची मते जाणून घेणे व नव्याने काहीजणांना प्रवेश देण्यासाठी या बैठकीत विचारमंथन होणार आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते नारायण राणे यांचा या बैठकीत भाजपप्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. राणेदेखील या बैठकीला हजर राहतील, असे सांगण्यात आले. तथापि, आ. राणे किंवा शहराध्यक्ष आ. जगताप यांच्याकडून दुजोरा मिळू शकला नाही.

तीन दशकांनंतर शहरात बैठक
भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने शहर राष्ट्रवादीला जोरदार सुरुंग लावलेला असून, पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते राहिलेले आमदार तथा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यासह भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी भाजप जवळ केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागलेली आहे. निवडणुकीच्या तोंडावर बहुतांश राष्ट्रवादी फुटून भाजपमध्ये आलेली आहे. यापूर्वी 1980 मध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पिंपरी-चिंचवडमध्ये झाली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच अशाप्रकारची बैठक होत आहे. राज्यातील राजकीय स्थिती, निवडणुकांतील यश-अपयश आणि आगामी धोरणे याबाबत या बैठकीत उहापोह होणार आहे.