राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी संदीप पवार की प्रशांत शितोळे?

1

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पदाधिकारी बदलाचे निर्णय
नेते अजित पवार आठवडाभरात करतील घोषणा

पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील 15 वर्षांच्या सत्तेचे सव्वा वर्षांपूर्वी पानिपत झाल्यानंतर हडबडून गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता लोकसभा व निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच ठिकाणचे पदाधिकारी बदलाचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिका विरोधी पक्षनेतेपदी दत्ता साने यांची नियुक्ती केली. आता शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या असून युवा नेते संदीप पवार व माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांची नावे आघाडीवर आहेत. अधिकृत माहितीनुसार याच दोघांपैकी एकाची निवड ज्येष्ठ नेते अजित पवार या आठवडाभरात करतील. दरम्यान, विद्यमान अध्यक्ष संजोग वाघेरे यांना लोकसभा, तर ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांना विधानसभा निवडणुकीत उतरविण्यात येणार असल्याचे समजते.

संघटनात्मक पदांवर नवे चेहरे
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘राष्ट्रवादी’ने संघटनात्मक पदांवर नव्या चेहर्‍यांना संधी देवून सत्ताधारी भाजपवर ‘हल्लाबोल’ करण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. त्यादृष्टीने संघटनात्मक पातळीवर विविध बदलही करण्यात येत आहेत. यात बालेकिल्ला असणार्‍या पिंपरी-चिंचवड शहरात अधिक लक्ष घातले जात आहे. त्यादृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भ्रष्टाचार अथवा अन्य कोणताही आरोप नसलेला उमेदीचा चेहरा राष्ट्रवादीत संघटनात्मक पदावर काम करावा, अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठींची आहे.

शितोळे यांना झुकते माप मिळण्याचा अंदाज
विधानसभेसाठी नाना काटे यांना ताकद मिळावी यासाठी चिंचवडमधीलच नव्या दमाचा चेहरा शहराध्यक्षपदी निवडण्यात येणार आहे. सध्यस्थितीला माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी शहराध्यक्षपदासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत त्यांनी बंडखोरी केली होती. त्यानंतरही त्यांना पक्षाने विद्यमान कार्याध्यक्षपदावर संधी दिल्यामुळे निष्ठावान पदाधिकार्‍यांमध्ये त्यांच्या नावाला विरोध आहे. मात्र, आक्रमक भूमिका घेणारा तरुण चेहरा म्हणून शितोळे यांना झुकते माप मिळेल, असाही अंदाज पदाधिकार्‍यांचा आहे.

संदीप पवार यांना निष्ठेचे फळ मिळण्याची शक्यता
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून संदीप पवार यांची ओळख आहे. शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्यानंतर पवार यांनी स्पर्धेत उडी घेतली आहे. ताथवडे गावातील विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाविरोधात न्यायालयात स्थानिक नागरिकांची बाजू प्रभावीपणे मांडणारा अभ्यासू युवा चेहरा शहराध्यक्षपदासाठी हितकारक ठरु शकतो. तसेच, लोकसभा निवडणुकीत पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा पिंपरी-चिंचवड हद्दीलगतच्या मुळशी तालुक्यातील गावांत आक्रमकपणे प्रचार केला होता. मुळशी पंचायत समितीचे तत्कालीन सभापती रमणनाना पवार यांनी 2001 पासून राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यांच्या निधनानंतर ताथवडेच्या पहिल्या नगरसेविका यमुना पवार यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती. गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात वातावरण असतानाही संदीप पवार यांनी ताथवडे-पुनावळे- काळाखडक-वाकड प्रभागातून निवडणूक लढवली होती. मात्र, निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. विशेष म्हणजे, स्वच्छ प्रतिमा आणि अजित पवार यांचे निष्ठावान असलेल्या संदीप पवार यांच्याकडे शहराध्यक्षपदाची सूत्रे दिली जातील, असे राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे.