राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्षपदी प्रशांत शितोळे

0

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्षपदी स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती केली. नियुक्तीचे प्रमाणपत्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, डॉ. शैलेश मोहिते-पाटील आदी उपस्थित होते.

तीनवेळा नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रशांत शितोळे तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी स्थायी समितीचे सभापतीपद देखील भुषविले आहे. अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. फेब्रुवारी 2017 च्या महापालिका निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारले होते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला होता. पराभवानंतर ते काही काळ राष्ट्रवादीपासून चार हात लांब राहिले. त्यानंतर आता राष्ट्रवादीत सक्रीय होण्यास सुरुवात केली आहे.

भाजपच्या राजवटीला एक वर्ष पूर्ण होत आले. या एक वर्षात भाजपने मोठ्या प्रमाणात चुकीची कामे केली आहेत. ही कामे जनतेसमोर आणणार असून त्यांची चुकीची कामे हाणून पाडण्यात येतील. काम करताना प्रत्येक व्यक्ती चुकते. पंरतु, भाजप अतिरेकी चुका करत आहे. राष्ट्रवादीवर खोटे-नाटे आरोप केले. मात्र, आम्ही भाजपवर पुराव्यानिशी आरोप करणार आहोत.