राष्ट्रवादीने केली तंबाखु, सिगारेट, बिडी, गुटख्याची होळी

0

आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी

चिंचवड : जाहीरातींमध्ये पाहून शालेय विद्यार्थी सिगरेट, गोवा यांचे सेवन करताना दिसून येतात. व्यसन हे वाईटच असते. थ्रिल अनुभवण्यासाठी अनेक शालेय विद्यार्थी सिगरेट, पानमसाला खाताना दिसतात. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना धुम्रपानापासून दूर ठेवण्यासाठी व त्यांच्यामध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवती संघटना व सामाजिक न्याय महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखु, सिगारेट, बिडी, गोवा-गुटखा, पानमसाला यांची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. अजंठानगर येथे ही होळी करण्यात आली. यावेळी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा गंगा धेंडे उपस्थित होत्या.

या होळीला रामदास मोरे, अमोल भोईटे, प्रदीप गायकवाड, दिपक साकोरे, रशीद सय्यद, विनोद कांबळे, संगीता ताम्हाणे, शकुंतला भाट, लाला चिंचवडे, हमीद शेख, झहीर खान, प्रतिक साळुंके, चैतन्य चोरडीया, रामदास मोरे, लक्ष्मी वाघमारे, पवित्रा निकाळजे, कांताबाई धेंडे, पल्लवी साखळे, अंजु चौधरी आदी कार्यकर्तेही उपस्थित होते.

व्यसनाचे प्रमाण वाढलेले
याबाबत बोलताना प्रवक्ते फजल शेख म्हणाले, आजच्या तरुण पिढीमध्ये तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात लक्ष न देता व्यसनाधीन होऊन अभ्यासापासून वंचित राहतात. तसेच आजचा तरुण व्यसन करून दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे अनेक अपघात होतात. त्यामुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. कर्करोगासारख्या महाभयंकर रोगांना त्यामुळे अनेकांना सामोरे जावे लागते, श्‍वसनाचा त्रास, फुफ्फूसाचा विकार, मेंदूवरील संतोलन जाणे, असे अनेक रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे आजची काही तरूण पिढी ही भविष्याचा कोणताही विचार न करता व्यसनाला महत्व देत आहे. ही मोठी गंभीरबाब आहे हे नाकारता येत नाही.

गुटख्याची राजरोस विक्री
वर्षा जगताप व गंगा धेंडे मनोगतामध्ये म्हणाल्या की, गोवा, गुटखा यासारख्या पानमसाला पदार्थांना संपूर्णपणे विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील पानपट्टीवर, दुकानांमध्ये, महामार्गावरील चहाच्या टपर्‍यांवर राजरोसपणे याची विक्री चालू आहे. मुले, विद्यार्थी, तरूण सर्वांनाच याचे व्यसन जडले आहे. तरूण पिढीचे मोठे नुकसान होत आहे. याला आजचे सरकार हे जबाबदार आहे. शासनाकडून याबाबतीत काहीही उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या बेजबाबदार पणामुळे आजची तरूण पिढी हे व्यसनाधिनतेकडे वळत आहे, हे नाकारता येणार नाही.