पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. वंदना चव्हाण या आठ वर्षांपासून शहराध्यक्षपदी आहेत. त्यांना राज्यसभेसाठीही संधी दिली आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदी नव्या चेहर्याला संधी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
2016 पासून मागणी
पुण्याच्या शहराध्यक्षांमध्ये बदल केला जावा, अशी मागणी 2016 पासून केली जात आहे. या पदासाठी खूपजण इच्छुक आहेत यात पालिकेतील माजी सभागृहनेते आणि विद्यमान नगरसेवक सुभाष जगताप, माजी उपमहापौर आणि नगरसेवक दिलीप बराटे, दीपक मानकर माजी महापौर प्रशांत जगताप अशी अनेक नावे चर्चेत आहेत.
पक्षाने घेतल्या होत्या मुलाखती
राष्ट्रवादीचा गड मानला जाणार्या पुण्यातुन विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर पालिका निवडणुकांपूर्वी शहराध्यक्ष बदलण्याच्या मागणीने जोर धरला होता. त्यामुळे पक्षानेच शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. शहरातील इतर सर्वच पक्षांच्या अध्यक्षपदी नव्या चेहर्यांची नियुक्ती करण्यात आल्याने राष्ट्रवादीमध्ये खांदेपालट होईल, अशी अटकळ बांधण्यात येत होती.
शरद पवारांनी घेतली होती स्पष्ट भूमिका
अखेरच्या टप्प्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पालिका निवडणुकांपर्यंत शहराध्यक्षपद वंदना चव्हाण यांच्याकडे कायम राहील, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. गेल्या वर्षी पालिका निवडणुकांनंतर त्यांनीच नैतिक जबाबदारी स्वीकारत चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. पक्ष नेतृत्वाने तो स्वीकारला नाही आणि नव्याने कोणाची नियुक्ती करण्यासाठी पावले उचलली नाहीत. आता पुन्हा एकदा शहराध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहे.