राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबिर नुकतेच कर्जत येथे पार पडले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पक्षाची धूळधाण झाल्यानंतर या पक्षाचे बडे बडे नेते गायब झाले आणि जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर चिडीचूप झाले होते. भुजबळांच्या अटकेनंतर तर अनेक नेते कोमात गेले होते.सिंचन घोटाळ्यात या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे नाव आल्यानंतर त्यांची पाचावर धारण बसली होती. विधानपरिषदेत हे महाशय मुख्यमंत्र्यांचे कौतुक करण्याची एकही संधी सोडत नव्हते, असा पक्ष आता आपले नेते शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाची स्वप्ने पुन्हा पाहत आहे. हाच पक्ष आपली पापे झाकण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्यासाठी एका पायावर तयार झाला होता. आता भाजपची हवा विरताच त्याचा टीकाकार बनला आहे.
सोनिया गांधी यांच्याविरुद्ध बंड करून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. राज्यात 1995 ते 99 या काळात शिवसेना भाजपचे सरकार होते.त्यावेळी काँग्रेस एकसंघ होती. शरद पवारांच्या सूचनेनुसार छगन भुजबळ यांना विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपदी आणण्यात आले. भुजबळ यांनी सेना भाजप सरकारला जेरीस आणले होते. दरम्यान, सोनिया गांधी यांनी काँग्रेसची धुरा सांभाळताच पवारांच्या लक्षात आले की आता आपल्याला पंतप्रधान पद कधीच मिळणार नाही. त्यांनी सोनिया गांधींचा परदेशी मूलतत्त्वाचा मुद्दा काढून काँग्रेसविरोधात बंड केले. पवारांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. 1999च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांविरोधात लढले. राष्ट्रवादी काँग्रेसची एवढी हवा होती की हेच सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून निवडून येतील, असे ठोकताळे बांधले जात होते. भुजबळांचा अ-10 हा बंगला पक्षाचे मुख्यालय बनले होते. या बंगल्यावर प्रचंड गर्दी असे. त्याउलट काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले एकटेच असत. मात्र, विधानसभा निवडणुकीचे निकाल वेगळेच लागले. काँग्रेसला 75 जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 58 जागा मिळाल्या. पवारांची विश्वासार्हता पुन्हा एकदा संपली होती. याच पवारांनी 1978 साली वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून पुलोदचा प्रयोग केला होता. हे सरकार दोन वर्षांत पडले. तेव्हापासूनच शरद पवारांवर काँग्रेसवाले विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. दुसर्या बंडानंतर ही विश्वासार्हता पुरती गमावली होती. आता तर त्यांनी पंतप्रधानपदाची आशाच सोडून दिली होती. नांदेड महानगरपालिका निवडणुकीनंतर भाजपविरोधी वातावरण वाढत आहे. याचा फायदा काँग्रेसला होऊ नये यासाठी आतापासूनच भाजपविरोधी आघाडीचा प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केला आहे. या आघाडीचे नेते म्हणून आपले नाव पवारांनी प्रफुल्ल पटेल यांच्या तोंडातून जाहीर करून घेतले आहेत. राज्यापुरता मर्यादित असलेल्या या पक्षाने पंतप्रधानपदाची स्वप्ने कितपत पाहावीत हा त्याचा प्रश्न आहे. शरद पवार जाणता राजा आहेत. त्यांना व्हिजन आहे हे सर्व ठीक आहे, पण पवारांच्या विश्वासार्हतेेचे काय? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. 1999 ते 2014 काँग्रेससोबत सत्ता उपभोगल्यानंतर हाच पक्ष निवडणूक निकालानंतर भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार होतो आणि पुन्हा धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारतो.
शरद पवारांना शिवसेना किंवा भाजपची भीती नाही.त्यांच्याविरोधात जनमानसात वातावरण आहेच, पण या वातावरणाचा फायदा काँग्रेसला झाल्यास आपल्या पक्षाचे अस्तित्व हे नाममात्र राहील याची त्यांना भीती आहे. त्यामुळेच त्यांनी हे चिंतन शिबिर आयोजित करून भाजपविरोधी आघाडीचे आपणच कर्ते करविता आहोत, हे भासवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही पवारांची हूल भाजपला नाही तर काँग्रेसला आहे. काँग्रेस मात्र आता पवारांच्या मागे फरफटत जाणार नाही.देशभर काँग्रेस कासवगतीने भाजपविरोधी वातावरणाचा फायदा घेणार आहे. नांदेडमध्ये स्वतंत्र लढून काँग्रेसने यश मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. हे चिंतन शिबिर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची अस्तित्वासाठी चाललेली धडपड आहे. या स्वार्थी राजकारणाचा राष्ट्रवादी काँग्रेसला तोटाच सहन करावा लागेल.
– नितीन सावंत
सहसंपादक, जनशक्ति
9892514124