अजित पवार होणार सहभागी
पिंपरी-चिंचवड : केंद्र आणि राज्य सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात आंदोलने सुरु केली आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस रविवारी (दि. 26) दुपारी तीन वाजता ‘हल्लाबोल’ आंदोलन करणार आहे. हनुमान मंदीर, आकुर्डी गावठाण, ते तहसील कार्यालय प्राधिकरण येथे धडकणार असून मोर्चाचे सभेत रुपांतर होईल. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार आहे.अशी माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. या आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: सहभागी होणार आहेत, असेही त्यांनी कळविले आहे.
विविध आघाड्यांवर दोन्ही सरकार अपयशी
केंद्र आणि राज्य सरकार सर्वंच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. फसलेली नोटबंदी, पूर्णतः फसलेली कर्जमाफी, वाढती महागाई, बिघडलेली कायदा-सुव्यस्था, लोडशेडिंग, उद्योग, रोजगारात झालेली घसरण, शिष्यवृत्तीचे प्रश्न, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण असे विविध प्रश्न सरकाराला सोडविता आले नाहीत. निवृत्त शिक्षक, शिक्षक यांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, सरसकट शास्तीकर माफीच्या घोषणेचे काय झाले?, स्मार्ट सिटीचे पुढे काय झाले. रिंगरोड रद्द करावा, रेडझोनची हद्दी कमी करण्यात यावी. मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी. शहरातील अस्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा याचा जाब विचारण्यासाठी ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात येणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
बैठकीत केले नियोजन
आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी गुरूवारी खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला माजी आमदार विलास लांडे, महिला शहराध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेविका संगीता ताम्हाणे, नगरसेवक संजय वाबळे, सरचिटणीस फजल शेख, आनंदा यादव, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, अरूण बोर्हाडे, विजय लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, प्रदीप गायकवाड, विशाल काळभोर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, संतोष वाघेरे, रशिद सय्यद आदी उपस्थित होते.