राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनांचा वाढला जोर

0

पिंपरी-चिंचवड (बापू जगदाळे) – राज्याबरोबर शहरात देखील ‘राष्ट्रवादी’ने भाजपा सरकारच्या विरोधात वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलनाचा जोर वाढविला आहे. यामध्ये युवक आघाडीचीही फळी जोमाने भाग घेत आहे. असे असले तरी प्रत्येक आंदोलनामध्ये शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, विठ्ठल काटे, विशाल वाकडकर व महिला शहर अध्यक्षा उर्मिला काळभोर असे मोजकेच पदाधिकारी रस्त्यावर उतरत असलेले दिसतात. यामध्ये राष्ट्रवादीच्या जीवावर अनेक पदे उपभोगलेले नेते मंडळी दिसत नसल्याची खंत कार्यकर्त्याकडून व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम आंदोलनाची धार कुठेतरी कमी असल्याचे दिसत आहे. यामुळे राष्ट्रवादीची एकी अद्यापही दुभंगलेलीच दिसत आहे.

पराभवातून बोध नाही
प्रत्येक पक्ष हा गटातटात विभागलेलाच असतो. या गटा-तटाला खुद्द पक्षनेतेच आपल्या सोयीनुसार खतपाणी घालत असतात. हे अनेकदा सिध्द झाले आहे. याचा परिणाम काही वेळा उलटा देखील होतो. त्याची जबर किंमत पक्षाला भोगावी लागते. असेच काही शहरातील राष्ट्रवादी पक्षाबाबत घडले आहे. यातून शहरातील विधानसभा बरोबरच राष्ट्रवादीची महापालिकेतील सत्ता देखील गेली असल्याचे नाकारुन चालणार नाही. आज सत्तेत असलेले अनेक पदाधिकारी हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते होते; पण वरिष्ठ नेत्याच्या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून अनेकांनी भाजपाचे कमळ उचलून धरले व आपल्या खुर्च्या अधिक बळकट केल्या. असे असले तरी अद्यापही राष्ट्रवादीने या पराभवातून काही धडा घेतला असल्याचे दिसत नाही.

नगरसेविकांची आंदोलनाकडे पाठ
आज सर्वच आघाडीवर सभागृहात राष्ट्रवादी पक्ष अपयशी ठरत आहे. अनेक समस्यांवर त्यांच्या नेत्यांचा आक्रमक पवित्रा दिसत नाही. कोणत्याही प्रश्‍नावर सर्वांची एकी तर कधीच दिसत नाही. हीच परिस्थिती पक्षाच्या वतीने केली जाणार्‍या प्रत्येक आंदोलनात दिसून येत आहे. मग यामध्ये राष्ट्रवादी युवकचे एखादे आंदोलन असो किंवा फादर बॉडीचे. या आंदोलनात वाघेरे व त्यांची टीम, तर युवक आणि महिला कार्यकारणीचे पदाधिकारी सोडले तर पक्षाचे अनेक नगसेवक या आंदोलनाकडे पूर्णपणे पाठ फिरवताना दिसतात. ही बाब राष्ट्रवादीची पुन्हा ताकद वाढविण्यास मोठ्या प्रमाणात अडथळा ठरत आहे. या बाबत वरिष्ठांनी सर्वांनाच समज देण्याची गरज असल्याचे कार्यकर्त्याचे म्हणणे आहे.

पवारांचे याकडे दुलर्क्षच
पक्षाचे शहरातील सर्वेसर्वा, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सर्वांनाच या बाबत कडक समज देणे गरजेचे आहे. मात्र, त्यांनी यामध्ये अजूनही हात घातलेला नाही. त्यामुळे पक्षातील पदाधिकार्‍यांमध्ये चुकीचा समज गेला असल्याचे काही कार्यकर्ते दबक्या आवाजात बोलतात. जर राष्ट्रावादीला शहरातील आपले गतवैभव पुन्हा मिळवायचे असेल, तर लोकसभा निवडणुकी अगोदर पक्षातील बेशिस्तीवर तोडगा काढला पाहिजे. जे पदाधिकारी काम करत नाहीत, त्यांच्यावर कठोर पावले उचलली पाहिजेत, असा मतप्रवाह आहे.

सत्ता नसल्याने कार्यकर्ते झाले सुस्त
राज्यात व पालिकेत सत्ता नसल्याने राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते एक तर भाजपामध्ये सामिल झाले आहेत. तर जे आहेत ते सत्ता नसल्यामुळे सुस्त झाल्याचे दिसत आहेत. वास्तविक राज्यात राष्ट्रवादीला अनुकूल वातावरण असल्याचे दिसत आहे. त्या अनुषंगाने संपुर्ण राज्य पिंजून काढले असून सर्वांनाच जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन फक्त वाघेरे, वाकडकर व काळभोर व त्यांची टीमच करत असल्याचे दिसत आहे; पण यामध्ये पक्षाचे काही जेष्ठ नेते व नगरसेवक कुठेही सहभागी असल्याचे दिसत नाही. ही बाब राष्ट्रवादीच्या पुढील वाटचालसाठी चिंतेची ठरू शकते.