राष्ट्रवादी, कॉग्रेसची संघर्षयात्रा 15 रोजी जिल्ह्यात

0

जळगाव । शेतक़र्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी राज्यभरात विरोधी पक्षांनी संघर्षयात्रेचे आयोजन केले आहे. विदर्भानंतर आता संघर्षयात्रा जळगाव जिल्ह्यात येणार आहे. सलग तीन दिवस संघर्षयात्रेतील नेते जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या परिवारांच्या भेटी घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिली. यावेळी गुलाबराव देवकर, गफ्फार मलिक, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

15 एप्रिलपासून सुरुवात
सकाळी सिदखेड राजा येथील जिजाऊ यांच्या जन्मस्थळावर जाऊन संघर्षयात्रेला सुरुवात करण्यात येणार असून तेथे जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले आहे. चिखली , बुलढाणा येथे शेतकर्‍याच्या भेटी घेतल्यावर मुक्ताईनगर मार्गाने जिल्ह्यात विरोधी पक्ष संघर्षयात्रेला सुरुवात करणार आहे. वरणगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 16 एप्रिलरोजी जळगाव येथून एरंडोल, पारोळा, अमळनेर , बेटावद , शिरपूर , नरडाणा , धुळे, नंदुरबार येथे आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या भेटी विरोधी पक्षनेते घेणार असून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

दिग्गज नेते जिल्ह्यात येणार
मुक्ताईनगर येथून विरोधकांच्या संघर्षयात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, राधाकृष्ण विखेपाटील, बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राज्यातील विरोधी पक्षातील दिग्गज नेते दाखल होणार आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना या संघर्षयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.