इंदापूर । राष्ट्रहीत साध्य करण्यासाठी प्रत्येकाने धेयनिश्चिती करावी, असे मत पश्चिम महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक प्रमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी व्यक्त केले. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील कर्मयोगी ज्ञानवर्धन परीक्षा केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ’राष्ट्राच्या जडणघडणीत युवकांचे योगदान’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केले पाहिजे. आत्मविश्वास वाढवला पाहिजे. कारण ग्रामीण भागातूनच प्रशासनात कार्यक्षम अधिकारी येत असतात. आजचे जग हे स्पर्धेचे आहे अशा जगात कौशल्य मिळवले पाहिजे आणि पर्यायपण ठेवले पाहिजेत तरच आपण यशस्वी होतो. राष्ट्राच्या जडणघडणीत युवकच योगदान देऊ शकतात. त्यांच्यामधूनच उद्याचे सक्षम अधिकारी, राजकारणी, जबाबदार नागरिक तयार होतील आणि आपले राष्ट्र आपोआप प्रगतीकडे वाटचाल करेल, असे बर्गे यांनी पुढे सांगितले.
इंटरनेट, प्रोजेक्टरची सुविधा
या कर्मयोगी ज्ञानवर्धन स्पर्धा परीक्षा केंद्रातून आपल्या भागातील विद्यार्थी निश्चितच अधिकारी बनतील त्यांना याठिकाणी इंटरनेट, प्रोजेक्टर, वातानुकूलीत वर्ग अशा सुविधा येणार्या काळात पुरविण्यात येतील, अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी भानुप्रताप बर्गे यांच्या कार्याचा परिचय करून दिला. यावेळी संस्थेचे सचिव मुकुंद शहा, अमर पाटील, बापू जामदार, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळ, प्रा. साबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब काळे यांनी तर आभार प्रा. नामदेव पवार यांनी मानले.