पुणे । 20व्या सब-ज्युनियर गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मुलींच्या गटात हरियाणाने निर्विवाद वर्चस्व राखले. तर या गटात महाराष्ट्राला उपविजेतेपद मिळाले. स्वामी समर्थ ज्ञानपीठ संचलित सह्याद्री नॅशनल स्कूल आणि सह्याद्री कुस्ती संकुल तसेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने ही स्पर्धा आयोजित केली होती. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील कुस्ती हॉलमध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुलींच्या 10 वजनी गटात स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये हरियाणाच्या मुलींनी 10 पैकी 9 वजनी गटात सुवर्णपदक पटकावून आपले निर्विवाद वर्चस्व राखले.
सृष्टी, स्मिताचीही चांगली कामगिरी
सृष्टी भोसले (61 किलो) आणि स्मिता पाटील (49 किलो) यांच्या रुपेरी कामगिरीचा मोठा वाटा राहिला. सुरुवातीपासून सरस कुस्ती खेळणार्या दोघींना अंतिम फेरीत हरियाणाच्या सहकार्यांचे आव्हान पेलता आले नाही. सृष्टी हरियाणाच्या अनुभवी अंशु विरुद्ध 10-0 अशी सहज हरली. कॅडेट गटातच जागतिक विजेती असलेल्या अंशुला प्रतिकार करण्यात सृष्टी अपयशी ठरली. स्मिता ही हरियाणाच्या जिवीका कडून 10-0 अशाच तांत्रिक गुणांवर हरली.
सुवर्णपदक दिल्लीच्या सिमरनने पटकावले
हरियाणाच्या मुलींनी 4 रौप्य आणि 2 कांस्यपदकेही मिळवली. एक सुवर्णपदक दिल्लीच्या सिमरन हिने 43 किलो वजनी गटात पटकावले. देहयष्टिने अन्य सहकार्यांपेक्षा काहिशा ताकदवान असणार्या हरियाणाच्या मुली पदलालित्यातही अन्य स्पर्धकांना भारी पडल्या. त्यामुळे त्यांच्या लढती देखील एकतर्फी झाल्या. त्यांना प्रतिस्पर्धी झुंजच देऊ शकले नाहीत. महाराष्ट्राने या स्पर्धेत 2 रौप्यपदकांसह 7 कांस्य अशी एकूण 9 पदके मिळवून आपली राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी सुधारली. मुलींनी 150 गुणांसह दुसरे स्थान मिळविले.
अंशुच्या अनुभवापुढे सृष्टी कमी पडली
सृष्टी शिंगणापूर येथील सदाशिव मंडलिक कुस्ती संकुलात दादासाहेब लवटे यांच्याकडे मार्गदर्शन घेते. स्कूल नॅशनल्स आणि खेलो इंडियाचा अनुभव तिच्याकडे होता. मात्र, अंशुच्या अनुभवापुढे ती कमी पडली, हे तिने मान्य केले. यापुढे अधिक कठोर मेहनत करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्याचा तिचा मनोदय आहे. स्मिता पाटील कोल्हापूरात आमशी येथील कुस्ती केंद्रात संदीप पाटील यांच्याकडे मार्गदर्शन घेते. स्मिताने यापूर्वी स्कूल नॅशनलमध्ये पदक मिळविले आहे. कठोर मेहनत घेऊन झालेल्या चुकांवर अभ्यास करून खेळ उंचावण्याचा तिचा मनोदय आहे. तिने देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे स्वप्न बाळगले आहे.