‘कच्चा लिंबू’ सर्वोत्तम मराठी चित्रपट
नागराजला पुन्हा राष्ट्रीय पुरस्कार
स्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली : 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा शुक्रवारी करण्यात आली असून, यंदा मराठी चित्रपट व कलाकारांनी पुरस्कारांच्या विविध विभागांत चौफेर यश प्राप्त केले आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ’कच्चा लिंबू’ हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला असून, ’सैराट’चा दिग्दर्शक नागराज मंजुळे याला ’पावसाचा निबंध’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले आहे. समीक्षकांनी नावाजलेला व ’ऑस्कर’ची दारे ठोठावणारा राजकुमार राव अभिनित ’न्यूटन’ या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना ’मॉम’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला तर, दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ’व्हिलेज रॉकस्टार’ या आसामी चित्रपटाने यंदा सुवर्णकमळावर नाव कोरले आहे. या चित्रपटांच्या निवडीसाठी परीक्षकांचे नेतृत्व दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केले होते. 3 मेरोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
‘मयत’ ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट
मराठी चित्रपट ’म्होरक्या’ला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील ’विशेष उल्लेखनीय’ पुरस्काराने गौरवण्यात येणार असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर देवकर यांनी केले आहे. तसेच सुयश शिंदे दिग्दर्शित ’मयत’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीत रिद्धी सेन यांना बंगाली चित्रपट ’नगर कीर्तन’साठी पुरस्कार मिळाला आहे. तर ’सर्वात लोकप्रिय चित्रपट’ या श्रेणीत ’बाहुबली : द कन्क्लूजन’ या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर 1 हजार कोटी रुपयांहून अधिक कमाई करणार्या बाहुबलीला जागतिकस्तरावर मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली आहे. सर्वोत्कृष्ट संगीतकार या श्रेणीत प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांना तर सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक या श्रेणीत गणेश आचार्य यांना ’टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातील ’गोरी तू लठ्ठ मार’ या गाण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘मृत्यूभोग’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कारावर उमटलेला मराठी ठसा
* सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : कच्चा लिंबू
* स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) : म्होरक्या – यशराज कर्हाडे
* सर्वोत्कृष्ट संकलन : मृत्युभोग
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शॉर्ट फिल्म) : पावसाचा निबंध – नागराज मंजुळे
* सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (नॉन फीचर) : मयत – सुयश शिंदे
* सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट : चंदेरीनामा- राजेंद्र जंगले
* नर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) : ठप्पा – निपुण धर्माधिकारी
इतर पुरस्कार
* सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : न्यूटन
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : श्रीदेवी (मॉम)
* सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : दिव्या दत्ता (इरादा)
* सर्वोत्कृष्ट साहसी दृश्यं : बाहुबली 2
* सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स : बाहुबली 2
* सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन : गणेश आचार्य (टॉयलेट एक प्रेम कथा)
* स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) : अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन- हिंदी)
* स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) : हेल्लो अर्सी (उडिया)- प्रकृती मिश्रा
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पदार्पण : वॉटर बेबी – पिया शाह
* सर्वोत्कृष्ट मानववंशशास्त्रावरील चित्रपट : नेम, प्लेस, अॅनिमल, थिंग
* सर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती : गिरीजादेवी माहितीपट
* सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर : ए.आर. रहमान- मॉम
* सर्वोत्कृष्ट गाणं : ए. आर. रहमान