राष्ट्रीय पुरुषांचे चरित्र घराघरांत पोहोचणार

0

मुंबई । महाराष्ट्राला अनेक थोर राष्ट्रीय पुरुषांचा वारसा आहे, अशा थोर पुरुष आणि त्यांच्या कार्याची ओळख महाराष्ट्रातील जनतेला व्हावी यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. थोर राष्ट्रीय पुरुषांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने वेगवेगळ्या 5 समित्याअंतर्गत साहित्य प्रकाशित करण्यास सुरुवात केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत थोर राष्ट्रीय पुरुषांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी एकूण 5 समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत. या समित्यामार्फत तयार करण्यात आलेले वेगवेगळे खंड राज्यातील जनतेला उपलब्ध करुन देण्यात येतात तसेच सदर ग्रंथ सर्व विद्यापीठे/महाविद्यालये व शासकीय ग्रंथालये यांच्या ग्रंथालयात वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती नावाने पहिली प्रकाशन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे एकूण 25 खंड प्रकाशित केले आहेत. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र खंड क्र.22 (सुधारीत) नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. या खंडामध्ये घटना समितीमधील सर्व 296 सदस्यांचा फोटो, सदस्यांच्या स्वाक्षर्‍या, भारतीय संविधानाची कॅलिग्राफी प्रत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी निगडित ऐतिहासिक स्थळे, पत्रव्यवहार, पत्रक, डॉ. बाबासाहेबांनी सुरू केलेली वृत्तपत्र, त्यांची ग्रंथसंपदा, त्यांच्या हस्ताक्षरातील 22 प्रतिज्ञा, त्यांच्यावर निघालेली नाणी व तिकिटे, जगभरातील त्यांची महत्त्वपूर्ण स्मारके इत्यादी माहितीचा समावेश करण्यात आला आहे.

ग्रंथालयात महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र
महाराज सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती अशी दुसरी प्रकाशन समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्याच्या पुरोगामित्वाची जडण घडण करण्यास प्रेरणादायी ठरलेल्या महाराजा सयाजीराव गायकवाड या युगपुरुषाची ओळख वाचकांना करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सयाजीराव गायकवाड यांनी त्यावेळी केलेली भाषणे, त्यांनी केलेला पत्रव्यवहार, त्यांची गौरवगाथा इत्यादी साहित्याचे एकूण 12 खंड तयार करण्यात आलेले आहेत. महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीमार्फत राज्यातील जनतेला हे सर्व पुस्तक स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तसेच राज्यातील सर्व विद्यापीठे/महाविद्यालये व शासकीय ग्रंथालये यांच्या ग्रंथालयातही ही पुस्तके वाचकासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

थोर राष्ट्रीय पुरुषांचे कार्य वाचकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न -विनोद तावडे
महाराष्ट्राला थोर राष्ट्रीय पुरुषांचा वारसा असून त्यांच्या कार्याची ओळख महाराष्ट्रातील जनतेला व्हावी यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. थोर राष्ट्रीय पुरुषांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने वेगवेगळ्या 5 समित्याअंतर्गत वेगवेगळे साहित्य प्रकाशित करण्यात येत आहे. मुळातच थोर व्यक्तिमत्त्वांची माहिती वाचकांना व्हावी, त्यांनी केलेले कार्य वाचकांसमोर यावे तसेच हे साहित्य आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी हा प्रयत्न आहे. आज वाचकांबरोबरच इतिहासाचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना, पीएचडी करणार्‍यांना या पुस्तकांचा नक्की फायदा होईल, असा मला विश्‍वास वाटतो. महाराष्ट्रातील इतिहासाचे जतन करून ठेवणे, थोर पुरुष् आणि त्यांच्या कार्याची ओळख समाजासमोर पुस्तकरुपात ठेवणे यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत प्रयत्न करण्यात येत आहे. आणि याचाच एक भाग म्हणून थोर राष्ट्रीय पुरुषांचे साहित्य प्रकाशित् करण्यासाठी एकूण 5 समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चरित्राचा समावेश
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीने एकूण 32 दुर्मिळ कादंबर्‍या, कथा संग्रह, लोकनाट्य, नाटक, लावणी आणि पोवाडे इत्यादी साहित्य संकलित केले आहेत. या साहित्यापैकी 19 कादंबर्‍यांचे 2 खंड तयार करण्यात आले आहेत. पहिल्या खंडात वारणेच्या खोर्‍यात, चित्रा, फकिरा, वैजयंता, चंदन, आवडी, माकडीचा माळ, वैर आणि गुलाम या 9 कादंबर्‍यांचा समावेश आहे. आणि दुसर्‍या खंडात रानगंगा, पाझर, हलगुज, मास्तर, कुरुप, तारा, वारणेचा वाघ, मूर्ती, अग्निदिव्य व मयूरा या 10 कादंबर्‍यांचा समावेश आहे.

राजर्षी शाहू महाराजांची दुर्मीळ दस्तऐवज
राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीने राजर्षी शाहू गौरव ग्रंथाची तिसरी सुधारित आवृत्ती 1350 पेक्षा अधिक पृष्ठांची प्रकाशित केली आहे. त्यामध्ये शाहू छत्रपती समकालीन काही लेखक इतिहासकार, साहित्यिक, विचारवंत इत्यादिंचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या ग्रंथात शाहू छत्रपतींनी काढलेले आदेश, हुकूम, जाहीरनामे आणि शाहू महाराजांनी केलेले काही सामाजिक कायदे तसेच शाहू छत्रपतींच्या दुर्मीळ छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीने महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित एकूण् 13 खंड मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रकाशित केले आहेत.