राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या समारोपात ’राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ प्रदान

0
समाजमनाची वैचारिक स्वच्छता हे गाडगेबाबांचे स्वप्न
व्याख्याते प्रा. तेज निवळीकर यांचे प्रतिपादन
भोसरी : संत गाडगेबाबा हे कृतिशील सुधारक होते. विचार, निर्णय आणि कृती या त्रिसूत्रीचा अवलंब करून कीर्तनातून समाजात जागृती केली. गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक परिवर्तनासाठी वेचले. त्यांचे विचार परखड असले, तरी त्यांना फारसा विरोध झाला नाही. कारण त्यांच्या विचारात आणि आचारात एकवाक्यता होती. आपल्या भोवतालच्या परिसराच्या स्वच्छतेबरोबरच समाजमनाची स्वच्छता व्हावी, हे गाडगेबाबांचे स्वप्न होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते आणि गागडेबाबांचे अभ्यासक प्रा. तेज निवळीकर यांनी केले. साहित्यातून सामाजिक सुधारणेचा विचार पुढे नेण्यासाठी कायमच प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. प्रितम-प्रकाश महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन व प्रकाश पगारिया व्याख्यानमालेतच्या समारोपप्रसंगी प्रा. तेज निवळीकर बोलत होते.
सांगतेवेळी पुरस्कारांचे वितरण
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस, डॉ.ललिता सबनीस, मुख्य संयोजक डॉ.अशोककुमार पगारिया, स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक प्रकाश रोकडे, प्रीतम-प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक शिंदे, बंधुता प्रतिष्ठानचे प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख, व्याख्याते प्रा. निवळीकर यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’, तर पीपल्स बँकेचे संचालक बबनराव भेगडे यांना ‘स्वामी विवेकानंद पुरस्कार’ डॉ. सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी एकविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अशोककुमार पगारिया यांची निवड करण्यात आली. बबनराव भेगडे, डॉ. अशोक शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
बंधुता हे मूल्य आवश्यक
डॉ.श्रीपाल सबनीस म्हणाले की, संविधानाचा विचार सगळीकडे पोहोचविण्यासाठी बंधुता हे मूल्य अतिशय आवश्यक आहे. आर्थिक श्रीमंतीपेक्षाही वैचारिक श्रीमंती अधिक महत्वाची असते. त्यामुळे बंधुतेचे हे तत्वज्ञान श्रीमंतांपर्यंत पोहोचवायला हवे. आज समाजात अशांतता असण्याचे कारण हे बंधुतेचा अभाव आहे. स्वातंत्र्य, समता यासह बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांनाही आपण प्राधान्य दिले पाहिजे. माणसांच्या मनातील भेद जाळण्यासाठी बंधुता मनात रुजायला हवी. प्रकाश रोकडे म्हणाले की, बंधुतेचा विचार घेऊन गेली वीस वर्षे समाजात जागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजाला दिशा देणारे साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या भावनेतून राष्ट्रीय बंधुता संमेलने घेतली जात आहेत. बाळासाहेब जवळकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी आभार मानले.