‘एमएसआरडीसी’चे स्पष्टीकरण; 17 किलोमीटरचा चौपदरी रस्ता
पुणे : ‘जळगाव ते दिघी पोर्ट’ या नव्याने जाहीर केलेल्या ‘753 एफ’ राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या जागेतच हा रस्ता तयार केला जाणार असून, त्याबदल्यात कोणत्याही स्थानिक नागरिकाला मोबदला दिला जाणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सांगण्यात आले.
या रस्त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. हा राष्ट्रीय महामार्ग जळगावहून औरंगाबाद आणि नगरकडून पुण्याकडे येतो. पुण्यात चांदणी चौक ते पौड हा 17 किलोमीटर रस्ता चौपदरी असणार असून, पौडपासून दिघी पोर्टपर्यंत तीनपदरी रस्ता होणार आहे. हा रस्ता सुमारे 24 मीटर रुंद असून, तो रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे.
काही स्थानिक नागरिकांकडे या जागांचे सात-बाराचे उतारे असले, तरी 2010मध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कोणत्याही सरकारी विभागांच्या ताब्यात असलेल्या जागेचा मोबदला संबंधितांना देता येत नाही. त्यामुळे या रस्त्याचाही मोबदला मिळू शकणार नाही. संबंधितांनी या रस्त्यावरील अतिक्रमणे स्वत:हून काढावीत, असे महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी सात राज्य मार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामध्ये या रस्त्याचा समावेश आहे. हा रस्ता जळगावपासून पहूर-अजिंठा-सिल्लोड-औरंगाबाद-नेवासा-वडाळा आणि नगरहून पुण्याकडे येतो. पुण्याहून दिघी पोर्टपर्यंत सुमारे 103 किलोमीटर लांबीचा हा रस्ता केला जाणार असून, तो सिमेंट काँक्रिटचा असणार आहे. त्यासाठी सुमारे 400 कोटी रुपये खर्च येणार आहे. चांदणी चौक ते पौड हा सुमारे 17 किलोमीटरचा हा रस्ता चौपदरी करण्यात येणार आहे, तर ताम्हिणी घाट ते माणगावपर्यंत हा रस्ता तीनपदरी असणार आहे. चांदणी चौकापासून ताम्हिणी घाटापर्यंतचा रस्ता हा ‘एमएसआरडीसी’च्या पुणे विभागाकडून तयार केला जाणार आहे. माणगावपासून दिघी पोर्टपर्यंत रस्ता बनविण्याची जबाबदारी ‘एमएसआरडीसी’च्या मुंबई विभागाकडे असणार आहे.