जळगाव (प्रदीप चव्हाण )। मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी देशाच्या चलनातून पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डिजीटल व्यवहार करण्यावर विशेष भर दिले जात आहे. ग्रामीण भागात सोयी सुविधांचा अभाव बघता डिजीटल प्रणाली ग्रामीण भागात पोहचविणे हा शासनापुढील गंभीर समस्या आहे. त्यासाठी शासनातर्फे ‘एक पाऊल डिजीटल साक्षरतेकडे’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयामार्फत राबविल्या जाणार्या एनएसएसच्या हिवाळी शिबीरातून ग्रामीण भागात डिजीटल व्यवहाराचे धडे दिले जात आहे.
शिबीराच्या माध्यमातून शाश्वत विकास
विद्यार्थ्यामध्ये सामाजिक कार्याची बिजे रोवून, विद्यार्थ्यामधील सुप्त कला गुणांना व्यासपीठ निर्माण करुन विकासाची गंगा ग्रामीण भागात पोहचविण्याच्या उद्देशाने राज्यातील विद्यापीठे, शाळा महाविद्यालयाचे धोरण होते. शिबीरात सहभागी विद्यार्थी कल्पक विचारातून ग्रामीण भागात शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न करीत असतो. विद्यार्थ्याच्या कल्पक विचारातून शाश्वत विकासाचे धडे ग्रामस्थाना देण्याचे काम होत असते.
उमवीने घेतले टाकरखेडा दत्तक
‘एक पाऊल डिजीटल साक्षरतेकडे’ या उपक्रमांतर्गत कॅशलेस सोसायटी निर्माण करण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ देखील कॅशलेस व्हिलेज मिशन उपक्रमात सहभागी झाली आहे. यासाठी उमवीने विद्यापीठापासून जवळच असलेल्या एरंडोल तालुक्यातील दिड हजार लोकसंख्येचा टाकरखेडा या गावाला दत्तक घेतले आहे. विद्यापीठामार्फत राष्ट्रीस सेवा योजना एककाच्या माध्यमातून प्रत्यक्ष गावात जावून डिजीटल साक्षरतेचे धडे दिले जाणार आहे. तसेच दिड लाख लोकांपर्यत उपक्रम पोचविण्याचा प्रयत्न विद्यापीठ करणार आहे.
उमवि ऑनलाईन
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यातील महाविद्यालयाचा समावेश होत असल्याने विद्यापीठाचा आवाका मोठा आहे. शासनाने डिजीटल व्यवहार वाढविण्यावर भर देण्याचे घोषीत केल्यानंतर विद्यापीठात सर्वत्र ऑनलाईन व्यवहार होत आहे. विद्यापीठ परिसरात असलेल्या कॅन्टीन पासून तर प्रशासकीय इमारतीतील सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरु आहे.