इंद्रायणी नदीत एमआयडीसीचे विषारी पाणीः नदीकाठच्या गावांचे आरोग्य धोक्यात
चिंबळी : देहू आळंदी या तिर्थक्षेत्र परिसरातून वाहत असलेल्या इद्रायंणी नदीच्या रासायनमिश्रीत पाण्यामुळे चिंबळी, केळगांव, डुडूळगांव, मोशी, कुरूळी, मोई परिसरातील शेती धोक्यात आली आहे. या दुषित पाण्यामुळे शेतामध्ये पाण्यात मोठ्या प्रमाणात पांढरा फेस निर्माण होत आहे त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. खेड व हवेली तालुक्याच्या दक्षिण भागातून वाहत असलेल्या पवित्र इद्रायंणी नदीपात्रात प्रक्रिया न करता पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील चिखली तळवडे एमआयडीसीचे ऑईल, रसायनमिश्रित साडपांणी थेट इद्रायंणी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे चिंबळी, केळगांव कुरूळी मोशी नदीकाठच्या गावांची डोकेदुखी वाढली आहे. रसायनमिश्रित पाण्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
पिकांनाही पाण्याचा धोका
शेतकरी वर्ग हे पाणी आपल्या पिकांना देतात हे पाणी देतांना शेताना मोठ्या प्रमाणात पाढंरशुभ्र फेस साचत आहे. यामुळे पिकांना देखिल धोका निर्माण झाला आहे. तसेच नदीपात्रात जलपर्णीचा विळखा वाढू लागला आहे.त्यामुळे वाहुन येणारा कचरा देखील पाण्यात साचला जात असून परिसरात पाण्याची दुर्गंधी वाढली आहे.
प्रशासनाचा लोकांच्या आरोग्याशी खेळ
संत ज्ञानेश्वरमाऊलींच्या अलंकापुरीत व संत तुकाराम महाराजांच्या देहूनगरीत पालखी प्रस्थान सोहळ्याला राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येऊन या पवित्र इद्रायंणी नदीच्या पाण्यात स्नान करतात या वारकर्यांबरोबर नदीपात्रातलगत असणार्या गावच्या ग्रामस्थ व शेतकरी वर्गाच्या आरोग्यासोबत पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन खेळ करीत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थं शेतकरीवर्ग करीत आहे.
पालिकेचे दुर्लक्ष
इद्रायंणीच्या प्रदुषणा बाबत पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाशी वारकरी संप्रदाय संस्था,नदीलगतच्या गावांचे लोकप्रतिनिधी,नदी विकास मंच,तसेच ग्रामस्थांनी वारंवार निवेदन दिली आहेत. मात्र याबाबत कुठल्याही प्रकारची कारवाई नगरपालिकेने केलेली नाही याचा परिणाम जलचर प्राण्यांवर होऊन मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. परंतु ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येऊन थंडी खोकला जुलाब सर्दी ताप इत्यादी आजाराचे प्रमाण वाढले आहे.