’रासायनिक अभियांत्रिकी’मुळे जीवन सुखकरःडॉ. रत्नदीप जोशी

0

मविप, एमकेसीएलतर्फे वैज्ञानिक कट्ट्यावर मार्गदर्शन

पुणे : आयुर्वेदिक उत्पादने, खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने यामध्ये रासायनिक अभियांत्रिकीचा मोठा वापर केला जातो. तसेच वैद्यकीय क्षेत्रात तात्काळ आराम देणार्‍या वेदनारहित औषधांमध्येही प्रभावी रसायने वापरली जातात. त्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन अधिक सुकर होत आहे, असे मत एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. रत्नदीप जोशी यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग (मविप), मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर ’दैनिंदिन जीवनात रासायनिक अभियांत्रिकीचा वापर’ या विषयावर डॉ. जोशीं बोलत होते. प्रसंगी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. विनय र. र., सहकार्यवाह संजय मालती कमलाकर, प्रा. राजेंद्र सराफ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सेनापती बापट रस्त्यावरील मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या सभागृहात हा वैज्ञानिक कट्टा भरला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र सराफ यांनी केले, प्रा. विनय र.र. यांनी आभार मानले.

नवनवीन तंत्रज्ञान विकसित
डॉ. जोशी म्हणाले, या क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून, येत्या काळात रसायन अभियांत्रिकीमुळे क्रांती घडणार आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. या तंत्राच्या साहाय्याने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणावरील कंपन्यांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो. दैनंदिन जीवनामध्ये आपण सतत रसायनयुक्त वस्तूंचा वापर करत असतो. मोबाईल, खेळाचे साहित्य यामध्ये रासायनिक घटकांचा वापर केला जातो. निसर्गाला हानिकारक होणार नाही, अशा पद्धतीने रसायनाचा नियंत्रित वापर केला, तर त्याचा अधिक उपयोग मानवी जीवन उंचावण्यासाठी होऊ शकतो.