रावेर तालुका असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विनोद तराळ यांना निवेदन
रावेर- शेतीसाठी लागणार्या रासायनिक खतांची विक्री करण्यासाठी शासनातर्फे पीओएस मशिनद्वारे सक्ती करण्यात आली आहे मात्र अनेकदा त्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने रासायनिक खत विक्रेत्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.त्या अनुषंगाने पीओएस मशीनची जोडणी संगणकाशी करून साठा अपडेट करण्यासाठी सॉफ्टवेअर टाकून उपयोगी होण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत करण्याची मागणीी रावेर तालुका अॅग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी जिल्हाध्यक्ष विनोद तराळ यांना निवेदन दिले.
तांत्रिक अडचणींमुळे साठा अपडेट करण्यास अडचणी
खरीप व रब्बी हंगामात रासायनिक खतांचा जिल्ह्यात सर्वात जास्त पुरवठा व विक्री रावेर तालुक्यात होते त्यामुळे नियमित साठा व पीओएस मशीन अपडेट होणे गरजेचे असते. शासन स्तरावर याचा कायम पाठपुरावा होत असतो मात्र अनेकदा पीओएस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी किंवा नव्याने सॉफ्टवेअर अपडेट करावे लागतात. काही वेळेस संबंधित कंपनीकडून डीडी नंबर यायला उशीर झाल्यावर साठा जुळण्यास अडचणी येतात तर काही वेळेस मशीन बंद पडते यासाठी या मशीनचे नवीन सॉफ्टवेअर आत्मसात करून खत विक्रेत्याकडील संगणकाला जोडणी केल्यास साठा अपडेट आणि अंगठा घेतल्यावर एकाच वेळी दोन्ही कामे होणे शक्य होईल व शासनास ही साठा अपडेट मिळून विक्रेत्यांचा होणार त्रास कमी होईल याबाबत जिल्हा अॅॅग्रो डिलर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विनोद तराळ यांना रावेर ऍग्रो डिलर्स असोसिएशन तर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना यांची उपस्थिती
रावेर तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांच्या समवेत चंद्रकांत अग्रवाल, युवराज महाजन, डॉ.जी.एम.बोंडे, विकास महाजन, एकनाथ महाजन, स्वप्नील पाटील, एकनाथ पाटील आदींनी निवेदन दिले. यावेळी जळगाव येथील विनोद तराळ यांच्या कार्यालयात विनोद तराळ यांच्यासमवेत कोरोमंडलचे योगेश जाधव, कृषी व्यावसायिक दिनेश पाटील, विजय बर्हाटे आदी उपस्थित होते.
संघटनेची मागणी योग्यच -विनोद तराळ
रावेर तालुका असोसिएशनने केलेली मागणी योग्य असून संगणकाशी पीओएस मशीन सॉफ्टवेअरच्या सहाय्याने जोडणी झाल्यास विक्रेत्यांसह शासनाला ही साठा अपडेट मिळणार आहे व कामातही पारदर्शकता येईल.त्या अनुषंगाने राज्य पातळीवरील संघटनेच्या बैठकीत याबाबत मागणी लावून धरू तसेच कृषी विभागाशी ही याबाबत सल्लामसलत करून मागणी करता येईल, असे जिल्हाध्यक्ष विनोद तराळ म्हणाले.