रास्ता रोको करणार्‍या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची धरपकड

0

50 पेक्षा अधिक आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

खडकी : मराठा आरक्षणानंतर मुस्लीम आरक्षणाचा विषयही तापु लागला आहे. मुस्लीम आरक्षणा संदर्भात शासनाचे लक्ष्य वेधण्याकरीता मुल निवासी मुस्लीम मंचच्यावतीनेने रविवारी दुपारी बोपोडी येथे रास्ता रोको आंदोलनाचा प्रयत्न करण्यात आला. सर्व पक्षीयांचा समावेश असलेल्या या आंदोलनातील 50 हुन अधिक कार्यकर्त्यांना खडकी पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली. बोपोडी, पुणे -मुंबई रोड वाहतूक थांबा चौक येथे हे आंदोलन पार पडले. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), रिपब्लिकन मोर्चा, समाजवादी पक्ष या पक्षांनी पाठिंबा देत सहभाग घेतला. मुल निवासी मुस्लीम मंचेचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत असतानाच मुस्लीम आरक्षणाचा विषय पुढे आला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक आनंद छाजेड, राष्ट्रवादीचे विजय जाधव, रिपाईचे परशुराम वाडेकर, समाजवादी पक्षाचे रफिक कुरेशी, रिपब्लिकन मोर्चाचे राहुल ढमाले, एकता मानव संघटनेचे सादिक शेख तसेच मुल निवासी मुस्लीम मंचाचे अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. घोषणाबाजी द्वारे मुस्लीम आरक्षण तातडीने लागु करण्याबाबत मागणी करण्यात आली.

निर्णयाचे स्वागत करतो

मंचाचे अध्यक्ष इनामदार म्हणाले की, शासानाने मराठा आरक्षण संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मागील शासनाने मराठा समाजास 16 टक्के व मुस्लीम समाजास 5 टक्के आरक्षणाचा सकारात्मक स्वरुपाचा निर्णय घेतला होता. उच्च न्यायालयाने ही मुस्लीम समाजास शिक्षणामध्ये 5 टक्के आरक्षण देण्याचे आदेश दिले होते. परंतु सध्याच्या सरकारने या कडे दुर्लक्ष केले. सरकारची भुमिका या प्रकरणी जातियवादी दुटप्पी आहे. मुख्यमंन्त्री फडणवीस यांनी मराठा आरक्षणा बाबत योग्य निर्णय घेतला. त्यांनी 1 डिसेंबरला जल्लोष करा असे आवाहन मराठा समाजास केले. मुख्यमंन्त्री फडणवीस यांनी मराठा आरक्षणा बाबत जो निर्णय घेतला त्याच प्रकारचा निर्णय मुस्लीम आरक्षण प्रकरणी ही घेऊन आमच्याही जल्लोषाची तारीख जाहीर करावी अशी मागणी या वेळी करण्यात आली.