आज देशात गरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गीय समाजाच्या विकासाची कल्पना घेऊन काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी आणि जनतेचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न युवा नेता राहुल गांधी करत आहेत. गरीब शेतकर्यांच्या व दलितांच्या झोपडीत जाऊन चटणी-भाकर खाऊन त्यांची व्यथा समजवून संसदेमध्ये त्यांचे प्रश्न मांडून जनतेला दिलासा मिळवून देणारा हा नेता आहे.
2004च्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदार संघातून ते प्रथम निवडून आले. 2007 मध्ये त्यांनी युवक काँग्रेस व एनएसयुआयची धुरा सांभाळली. त्यांनी लोकशाही पद्धतीने संघटनात्मक निवडणुका घेतल्या. देशातील कानाकोपर्यात जाऊन त्यांनी जनतेच्या समस्या समजवून घेतल्या. देशात ज्या-ज्या ठिकाणी दलितांवर, शेतमजुरांवर व अल्पसंख्यांकावर हल्ला झाला त्या ठिकाणी जाऊन त्यांना दिलासा दिला व त्यांच्यावर होणार्या अत्याचाराविरुद्ध ठामपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. 2013च्या काँग्रेस अधिवेशनामध्ये त्यांना काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष करण्यात आले. स्व. इंदिरा गांधी व वडील स्व. राजीव गांधी यांनी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांचे बलिदान लक्षात ठेवून राहुलजी गांधींनी धर्मनिरपक्षतेसाठी धर्मांध शक्तीशी सातत्याने लढा देत आहे. आज देशात मतदारांपैकी जवळपास 60 टक्के युवा मतदार आहेत. त्यांचे मत जाणून घेण्यासाठी ते विविध विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये जाऊन युवकांशी सवांद साधून पक्षाची भूमिका त्यांच्या समोर ठामपणे मांडली आहे. गुजरातच्या निवडणुकांमध्ये राहुल यांनी पक्षाची धुरा सांभाळली. जवळपास 30 सभा घेऊन पक्षाची भूमिका समजावून सांगितली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला 132 वर्षे झाली आहे. पक्षाचे अध्यक्षपद अनेक दिग्गज नेते व थोर स्वातंत्र्य सेनानी यांनी भूषविले आहे. आज अध्यक्ष म्हणून राहुल गांधी हे पदभार स्वीकारणार आहेत. त्यांची काँग्रेस अध्यक्षपदावर निवड झाल्यामुळे संपूर्ण भारतात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी 2019च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल अशी मला खात्री आहे. अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल मी राहुलजींचे अभिनंदन करतो व त्यांची भावी कारकिर्द यशस्वी होवो अशी शुभेच्छा देतो!!
-रमेश बागवे, अध्यक्ष,
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी