राहुल गांधींनी घेतली मोदी यांची गळाभेट

0

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजकीय मतभेत असल्याने ते दोन्ही एकमेकांवर टीकास्त्र सोडत असतात, मात्र आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात वेगळेच चित्र दिसून आले. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेवरील भाषण संपल्यावर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली. त्यामुळे सभागृहातील उपस्थित अवाक झाले.

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेवर बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपा, पंतप्रधान आणि आरएसएसचे आभार मानत तुमच्यामुळे मला भारतीय असणे म्हणजे काय असते असा टोला मारला. यावेळी त्यांनी तुमच्या मनात माझ्याबद्दल राग आहे. तुम्ही मला पप्पू म्हणू शकता, शिव्या देऊ शकता. मात्र माझ्या मनात तुमच्याबद्दल द्वेष नाही असे सांगत आम्ही तुमच्यासारखे नसल्याचे म्हटले.

‘पंतप्रधान, आरएसएस व भाजपाचा मी आभारी आहे. तुम्ही मला हिंदू असणं काय आहे, भारतीय असणं काय आहे, या देशाची संस्कृती काय आहे, देशाचा इतिहास काय हे तुमच्यामुळे मी शिकलो असं राहूल म्हणाले. काँग्रेस काय आहे हे मला तुमच्यामुळे समजल्याचं राहूल म्हणाले. तुम्हा सगळ्यांना मी बदलीन तुम्हाला सगळ्यांना मी काँग्रेसमध्ये बदलीन’, असंही राहूल म्हणाले.

यावेळी राहुल गांधींनी महिला सुरक्षेवरुनही मोदी सरकारला घेरलं. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून हे सरकार महिलांचं संरक्षण करण्यास अयशस्वी ठरल्याची टीका राहूल गांधींनी केली आहे. देशामध्ये अल्पसंख्याकही सुरक्षित नसल्याची टीका त्यांनी केली. भारतातल्या महिलांचं संरक्षण करता न येणं ही शरमेची बाब असल्याचं राहूल म्हणाले. यानंतर मोदी व शाह या दोघांवरही टीका करताना या दोघांना सत्ता गेली तर काय होईल अशी भीती वाटत असल्याचं राहूल यांनी सांगितलं. माझं भाषण चांगलं झाल्याचं भाजपाच्या नेत्यांनी मला सांगितलं असून तुमच्या मनातलं मी बोलत असल्याचा दावा राहूल यांनी केला.