राहुल गांधीच काँग्रेसचे अध्यक्ष!

0

नवी दिल्ली : अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून येण्याची खा. राहुल गांधी यांची केवळ औपचारिकता बाकी आहे. काँग्रेस पक्षांतर्गत असलेल्या या सर्वोच्चपदासाठी खा. गांधी यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. या पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आला असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. अर्ज दाखल करतेवेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. एकापेक्षा जास्त अर्ज आले तर निवडणूक प्रक्रिया राबविली जाते. राहुल यांच्या अर्जाला 890 अनुमोदक लाभलेले असून, 11 डिसेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या दिवशी त्यांचा अर्ज कायम राहिला तर अध्यक्षपदी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा काँग्रेसकडून केली जाईल. गेल्या 19 वर्षांपासून सोनिया गांधी या काँग्रेसच्या अध्यक्षा असून, राहुल गांधी हेच त्यांचे उत्तराधिकारी ठरणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घडामोडींवर जोरदार टीकास्त्र डागले. गुजरातमधील एका सभेत बोलताना मोदींनी काँग्रेसमधील घराणेशाहीवर हल्लाच चढविला. औरंगजेब राजवटीबद्दल तुम्हाला शुभेच्छा आहेत, अशा खोचक शब्दांत त्यांनी खा. राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्यात.

राहुल काँग्रेसचे डार्लिंग : डॉ. मनमोहन सिंग
काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष असलेले खा. राहुल गांधी यांनी सोमवारी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. खा. गांधींव्यतिरिक्त कुणीही या पदासाठी अर्ज दाखल न केल्याने त्यांची बिनविरोध निवड आजच निश्चित झाली आहे. याप्रसंगी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खारगे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद, वरिष्ठ नेते आनंद शर्मा, अंबिका सोनी यांच्यासह काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तथापि, विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी यांची मात्र अनुपस्थिती होती. अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन चर्चा केली व आशीर्वाद घेतला. 5 डिसेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून, 11 डिसेंबर ही अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख आहे. त्याच दिवशी राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदी निवडीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. याप्रसंगी बोलताना डॉ. मनमोहन सिंग यांनी राहुल यांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, राहुल गांधी हे काँग्रेसचे डार्लिंग (लाडके) असून, ते पक्षाच्या महान परंपरेचा वारसा सक्षमपणे पुढे चालवतील. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पणतु व दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू असलेले 47वर्षीय राहुल हे त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाची सूत्रे हाती घेण्याची केवळ औपचारिकता आता उरली आहे. सोनिया या गत 19 वर्षांपासून पक्षाध्यक्षा असून, त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत सलग 15 वर्षे काँग्रेसकडे देशाची सत्ता होती.

काँग्रेसशी तुलना औरंगजेब राजवटीशी!
काँग्रेससह सर्वस्तरातून राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी करण्याच्या निर्णयाचे जोरदार स्वागत होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र गुजरातमधील धरमपूर येथील जाहीरसभेत राहुल यांच्यावर तोफ डागली. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून त्यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. 17व्या शतकातील मुघलसम्राट औरंगजेब याचे उदाहरण देत, मोदींनी काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीची तुलना औरंगजेबाच्या राजवटीशी केली. यापुढील औरंगजेब राजवटीसाठी काँग्रेसचे अभिनंदन करतो, असा टोलाही त्यांनी राहुल यांना लगाविला. आमच्यासाठी देश मोठा आहे. सव्वाशे कोटी जनता हीच देशाची हायकमांड आहे, असेही त्यांनी सांगितले.

भाजपचे ज्येष्ठ नेतेच अंतर्गत लोकशाहीचे बळी!
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भाजपने काँग्रेस व राहुल गांधींवर जोरदार टीका सुरू केल्याने काँग्रेसनेही या टीकेला जोरदार उत्तर दिले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपच्या पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा समोर आणत मोदी हे आपल्याच पक्षातील नेत्यांच्या प्रश्नांना कधी उत्तर देणार, असा सवाल उपस्थित केला. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, संजय जोशी, केशुभाई पटेल आणि आनंदीबेन पटेल यांसारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचे नाव घेत हे सर्व मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या अंतर्गत लोकशाहीचे बळी ठरल्याचा टोला लगावला. सुरजेवाला यांनी ट्विट केले आहे की, पंतप्रधानजी शहजाद, शाह-जादा आणि शौर्य यांच्याप्रती आपले उफाळून आलेले प्रेम सर्वचजण जाणतात. पण देशाला यापेक्षा तुम्ही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी शौरी, सिन्हा (यशवंत) आणि सिन्हा (शत्रुघ्न) यांनी विचारलेल्या प्रश्नांना कधी उत्तर देणार? आणि मोदीजी तुम्ही आणि शहा यांच्या अंतर्गत लोकशाहीचे बळी ठरलेले लालकृष्ण अडवाणी, केशुभाई पटेल, हरेन पंड्या, आनंदीबेन पटेल, मुरली मनोहर जोशी, संजय जोशी यांच्याबाबतही देशाला उत्तर द्या, गुजरात आणि देशाला काहीतरी सांगा. का, या सर्वांना इतिहासाच्या पुस्तकात बंद करण्यात आले, असा सवाल सुरजेवाला यांनी विचारला आहे.