राहुल गांधी काँग्रेसला तारणार का?

0

देशात गुजरात निवडणुकीनंतर सत्ताधारी व विरोधकांच्या राजकीय गणितांची जुळवाजुळव तीव्र पद्धतीने सुरू आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात बदल होत आहे. काँग्रेस पक्ष हा गेल्या 60-70 वर्षांपासून गांधी घराण्याभोवती केंद्रित झाला आहे. आता जी अध्यक्षपदाची खांदेपालट होत आहे, ती गांधी घराण्याकडेच होत आहे. याला खांदेपालट म्हणावी का, असाही प्रश्‍न राजकीय विश्‍लेषकांना पडला आहे. असो. राजकीय पक्ष व घराणेशाही यांचा भारतीय राजकारणातील संबंध अनन्यसाधारण आहे. अनेक वेळा गांधी घराण्यामुळे काँग्रेस तरली आहे, असेही इतिहासात दिसून आले आहे. लोकांचा गांधी घराण्यावर एकूण विश्‍वास अधिक असल्याचे हे सूचक असावे, असे वाटते. गुजरात निवडणुकीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचारादरम्यान राजकीय प्रतिमा सदृढ केली असल्याचे काँग्रेसमधील धुरिणांचे मत आहे, ते साहजिकच आहे. कारण बॅकफूटवर असलेल्या काँग्रेसला राहुल गांधींच्या तडफदार नेतृत्वाने सूर लागला आहे, असे दिसते.

गुजरातच्या निवडणुकीत काय होईल ते होवो. परंतु राहुल गांधी यांनी पक्षातील अध्यक्षपदाचा खुंटा बळकट केला आहे, हे नक्की. विद्यमान काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाची धुरा आता राहुल गांधी स्वीकारणार आहेत. लवकरच युवराजांचा राज्याभिषेक होईल, असे दिसते. 132 वर्षांचा इतिहास असलेल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा संजीवनीची गरज आहे. देशातला सगळ्यांत मोठा विरोधी पक्ष असणार्‍या काँग्रेसला 2014च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये वीस टक्क्यांपेक्षाही कमी मते मिळाली होती. याच निवडणुकीत नरेंद्र मोदीप्रणीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत केंद्रात सत्ता संपादन केली आहे. या निवडणुकांमध्ये एकूण 543 जागांपैकी काँग्रेसला 44 म्हणजे आठ टक्के जागा मिळवता आल्या, एवढा दारुण पराभव या राष्ट्रीय पक्षाला पाहावा लागला. काँग्रेसची आतापर्यंतची ही सगळ्यांत वाईट कामगिरी ठरली. त्या निवडणुकीनंतर अर्ध्या डझन राज्यांमध्ये काँग्रेसवर पराभवाची नामुष्की ओढवली.

सद्यःस्थितीत केवळ कर्नाटक आणि पंजाब या मोठ्या राज्यांसह तीन छोट्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता धूसर वाटते, तरीही काँग्रेसला विश्‍वास आहे की, मोदींच्या गुजरातमध्ये आम्हीच बहुमत मिळवू. राजकारण हे असेच असते, पराभवाच्या छायेत असले तरी येथे आत्मविश्‍वास ढळू न देणे हे खर्‍या राजकारण्याचे वैशिष्ट्य असते. सन 2009 ते 2014 या कालावधीत शहरी तसेच ग्रामीण अशा दोन्ही प्रदेशांतला मतदार काँग्रेसपासून दुरावला. समाजातील विविध घटक तसेच अल्पसंख्याक घटकांपासून काँग्रेसची नाळ तुटत चालली होती. तामीळनाडूसारख्या राज्यात काँग्रेसने शेवटची निवडणूक 1962 मध्ये जिंकली होती. पश्‍चिम बंगालसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील राज्यात 1977 नंतर काँग्रेसला निवडणुकांमध्ये बाजी मारता आलेली नाही. अमेठी या गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ला असणार्‍या मतदारसंघातून विजय मिळवत राहुल गांधींनी 13 वर्षांपूर्वी राजकारणातील मुख्य प्रवाहात प्रवेश केला होता. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसला देशातील नंबर एक पक्ष बनविण्यासाठी नेमके काय करणार, यावर काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे. हिंदू समाजापासून दूर न जाता हिंदू राष्ट्रवादाला मोडून काढण्याची अवघड जबाबदारी राहुल गांधी यांच्यासमोर आहे. दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नेमके काय धोरण ठरवणार, कोणकोणत्या पक्षांची मोट बांधणार, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

अशोक सुतार
8600316798