नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्या काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांची गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलीच खिल्ली उडवली. देशाचे युवानेते आता बोलायला लागले आहेत. त्यामुळे आपल्या आनंदाला आता पारावार उरला नाही. ते बोलले नसते तर मोठा भूकंप आला नसता, अशी टीका करून मोदींनी आपल्याकडे मोदींच्याविरुद्ध मोठे पुरावे असून, आपण बोललो तर देशात भूकंप येईल, या राहुल यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. वाराणसी येथील हिंदू विद्यापीठातील कार्यक्रमात मोदी बोलत होते. तर मोदी यांच्या या विधानाला राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशातील जनआक्रोश सभेत प्रत्युत्तर दिले. माझी हवी तेवढी खिल्ली उडवा; परंतु आधी देशातील तरुणांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. बँकेच्या रांगेत चोर नाही तर सामान्य जनता उभी आहे, त्यांच्याकडे लक्ष द्या. माझ्या आरोपांना मोदींनी उत्तर दिले नाही, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.
डॉ. मनमोहन सिंगही मोदींकडून टीकेचे लक्ष्य
निश्चलनीकरणाचा निर्णय घेताना पंतप्रधानांना परिणामांचा अंदाज नव्हता, अशी टीका करणार्या विरोधकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी वाराणसीत चांगलाच समाचार घेतला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनाही त्यांनी लक्ष्य केले. काही लोकं विरोध करताना स्वतःचे संतुलन गमावून बसतात. मनमोहन सिंग यांनी आपल्या भाषणात 50 टक्के गरीब असलेल्या देशात रोकडरहित अर्थव्यवस्था कशी राबविता येणार, असा सवाल केला होता. मात्र, असा सवाल करून मनमोहन सिंग स्वतःच्या अपयशाचा दाखला देत आहेत. गेल्या 60 वर्षांत देशातील लोकं कुणामुळे गरीब राहिलेत? असा प्रतिसवाल मोदींनी केला. डॉ. सिंग यांनी मला विरोध जरुर करावा. मात्र हे करताना त्यांनी भान ठेवावे, ते देशाचे माजी पंतप्रधान होते. लोकं त्यांचे बोलणे गांभीर्याने घेतात, असे सांगून मोदींनी डॉ. सिंग यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांचीही मोदींनी चांगलीच खिल्ली उढविली. काँग्रेसचे युवानेते आता कुठे भाषण करायला शिकत आहेत. त्यांना आता कुठे काही गोष्टी कळायला लागल्या आहेत. त्यांनी बोलायला सुरुवात केल्यापासून माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही. ते बोलले नसते तर मात्र मोठा भूकंप आला असता. मात्र त्यांनी मौन सोडले आणि आता भूकंप होणार नाही हे स्पष्ट झाले, अशी खोचक टीकाही मोदींनी केली.
सहारा, बिर्लाकडून पैसे घेतले की नाही ते सांगा?
मोदींनी उडवलेल्या खिल्लीला राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशातील बहराईच येथील जनआक्रोश सभेत उत्तर दिले. ते म्हणाले, मी मोदींना गुजरातमध्ये काही प्रश्न विचारले होते. त्यांनी या प्रश्नांची उत्तरे तर दिली नाही परंतु माझी खिल्ली उडवली. अडीच वर्षाच्या सत्ताकाळात मोदींच्या सरकारने एक टक्का लोकांना 60 टक्के लोकांचे पैसे दिले आहेत. काळापैसा कुठे आहे? हा देश एक टक्का लोकं आणि 50 परिवारांच्या ताब्यात आहे. 99 टक्के लोकांच्या जवळ आता पैसा उरला नाही, हे लोकं रांगेत उभे करण्यात आले आहेत. तुम्ही माझा कितीही मजाक उडवा; परंतु लोकांना, या देशातील तरुणांना हे सांगा की, तुम्ही सहारा, बिर्ला यांच्याकडून पैसे घेतले की नाही? चोरांनाही बँकेच्या रांगेत उभे रहावे लागत आहे, असे मोदी म्हणाले होते. त्यावर राहुल यांनी मोदींनी डोळे उघडून बघावे रांगेत कोण आहेत. रांगेत चोर नाही तर सर्वसामान्य नागरिक उभे आहे, अशी खोचक टिप्पणीही राहुल यांनी केली. टीव्हीवर झळकण्यासाठी लाखो रुपये लागतात. मोदींना हे पैसे देशातील 50 कुटुंबांकडून पुरवले जातात. या 50 कुटुंबांनी 8 हजार कोटींचे कर्ज घेतले आहे, हे कर्ज माफ करण्यासाठी मोदींनी गरिबांचे पैसे बँकेत टाकले. नोटाबंदीमागे हीच खेळी होती, असा आरोपही राहुल यांनी केला.